
सामना प्रतिनिधी । नांदेड
पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी सोमवारी दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर जवळपास २५ टक्के इव्हीएम आणि VVPAT यंत्रामध्ये बिघाड झाल्याने तासन तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ‘ज्या मतदानकेंद्रावर इव्हीएममशीनमध्ये बिघाड झाला त्या सर्व मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावे आणि मतमोजणीवेळी VVPAT स्लीपचीही मोजणी करावी’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण म्हणाले की, ‘निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. भाजप कार्यकर्ते खुलेआम मतदारांना पैसे वाटत होते, काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग केला. याबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या तरी निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही. मतदानापूर्वी मतदारांना पोल चीट देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे मात्र अनेक ठिकाणी मतदारांना पोल चीट वाटल्या गेल्या नाहीत.’
जवळपास २५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानयंत्रामध्ये बिघाड होणे संशयास्पद आहे. उन्हामुळे व तापमानामुळे मतदानयंत्रे खराब होतात हे निवडणूक आयोगाने दिलेले स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही. देशात यापूर्वी ही अनेकदा उन्हाळ्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दोन आठवड्यापूर्वीच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकाही कडक उन्हाळ्यात मे महिन्यामध्येच पार पडल्या होत्या तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानयंत्रामध्ये बिघाड झाले नव्हते. आज देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात इव्हीएम मशीन खराब झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या इव्हीएम मशीन गुजरातमधून आणल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे संशयात अधिक भर पडत आहे. उन्हामुळे मशीन खराब होते तर आयोगाने इव्हीएमऐवजी बॅलेटपेपरवर मतदान का घेतले नाही? असा संतप्त सवाल करून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.



























































