
काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. अनेक आमदार आणि मंत्री काँग्रेसच्याच नेत्यांविरुद्ध बोलताना दिसत आहेत. त्यात आता अजून एका आमदाराची भर पडली आहे. मध्य प्रदेश मधील गोहद येथील आमदार रणवीर जाटव यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांच्यावर लाचखोरीचे आरोप केले आहेत. तसेच सहकार मंत्री डॉ. गोविंद सिंह यांच्यावर अवैध उत्खनन केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. हे असंच सुरू राहिलं तर भाजपमध्ये सामील होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंजाब केसरीने दिलेल्या वृत्तानुसार, जाटव हे सिंधिया गटातील सदस्य मानले जातात. तर ड. गोविंद सिंह हे दिग्विजय सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. जाटव यांनी सिंह यांच्यावर लहार येथून रोज 200 ट्रक अवैध रेती उत्खननाचे आरोप केले आहेत. या कामात दिग्विजय सिंह हे त्यांची मदत करत आहेत, असेही गंभीर आरोप जाटव यांनी केले आहेत. तर आरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांच्यावर आरोप आहे की, त्यांचा मुलगा बंकिम हा परिचारिकांच्या बदलीसाठी लाच घेत आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सिलावट यांच्याकडे शिफारस केली असता ते या कर्मचाऱ्यांना दाद देत नाहीत. कारण त्यांचा मुलगा प्रत्येक काम करण्यासाठी लाचखोरी करतो, असे आरोप जाटव यांनी सिलावट यांच्यावर केले आहेत.
काँग्रेसमध्ये अशा दबावात राहण्यापेक्षा भाजपमध्ये सामील होण्याचा इशारा जाटव यांनी दिला आहे. त्यामुळे येथील राजकीय वर्तुळात आता वेगळी चर्चा रंगू लागली आहे. कारण जाटव हे पाच ते सहा आमदार सोबत घेऊन जातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर अशा प्रकारे काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाऊ लागले तर मध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार धोक्यात येऊ शकतं.


























































