गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’, पक्ष सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. पक्ष सदस्यत्वासह त्यांनी पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की, ‘अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील दरबारी राजकारण करणाऱ्यांनी देशासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्यासाठी लढा देण्याची इच्छा आणि क्षमता गमावली आहे. भारत जोडो यात्रा सुरू करण्याऐवजी नेतृत्वाने काँग्रेस जोडो यात्रा सुरू करण्याची गरज होती. या सगळ्यामुळे दु:खी मनाने मी काँग्रेससोबत असलेले माझे सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मी काँग्रेस पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा देत आहे.

आझाद यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, जानेवारी 2013 मध्ये जेव्हा राहुल गांधी यांची आपण (सोनिया गांधी) काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली तेव्हापासून त्यांनी पक्षातील चर्चात्मक यंत्रणा उध्वस्त केली. जुन्या जाणत्या लोकांना दूर करून कुठल्या तरी लाभासाठी हुजुरेगिरी करणारे, अनुभव नसणारे पक्ष चालवायला लागले. याचं सर्वात मोठं उदाहरण हे राहुल गांधी यांच्याद्वारे केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या माध्यमांसमोर चिंधड्या करणं हे होतं. या अध्यादेशावर काँग्रेसच्या कोअर ग्रुपमध्ये चर्चा झाली होती आणि त्यानंतर तो केंद्रीय मंत्रिमंडळाने पारीत केला होता. राहुल गांधी यांचा हा बालिशपणा म्हणजे पंतप्रधानांच्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न होता. या एका घटनेमुळे संयुक्त पुरोगामी आघाडीचा 2014 मध्ये पराभव होण्यास मोठा हातभार लागला.’

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 5 पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी त्यांची आजवरची नाराजी जाहीरपणे मांडली आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, 2013 साली जयपूरच्या अधिवेशनामध्ये मी आणि अन्य काही काँग्रेस सदस्यांनी काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवित करून 2014 च्या लोकसभा निवडणुकांना सामोरे कसे जायचे यासाठी एक उपाययोजना तयार केली होती. ही उपाययोजना काँग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये मंजूरही करण्यात आली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या उपाययोजना टप्प्याटप्प्याने अंमलात येणं अपेक्षित होतं. मात्र या उपाययोजना गेली 9 वर्ष धूळखात पडल्या आहेत. या उपाययोजनांबाबत मी आपणांस तसेच राहुल गांधी यांना वारंवार स्मरण करून देत होतो. मात्र त्यावर कधीही गांभीर्याने विचार केला गेला नाही.

आझाद यांनी पुढे म्हटलंय की, 2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पाणउतारा केल्यानंतर राहुल गांधी यांनी घाईगडबडीत पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सोडली. तुम्ही (सोनिया गांधी) नामधारी असून सगळे निर्णय हे राहुल गांधी घेतायत किंबहुना त्यांचे सुरक्षारक्षक आणि पीए हे निर्णय घेतायत.

आझाद यांनी जी-23 समूहातील काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेल्या टीकेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. आझाद यांनी म्हटलंय की माझी जम्मूमध्ये प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली होती. ही प्रेतयात्रा काढणाऱ्यांवर कारवाई करण्याच्याऐवजी त्यांचा राहुल गांधी यांनी वैयक्तिकरित्या सत्कार केला. आझाद यांनी म्हटलंय की दरबारी मंडळींनी कपिल सिब्बल यांच्या घरावर गुंड पाठवले आणि हल्ला करवला. ज्या कपिल सिब्बल यांनी तुमची आणि तुमच्या नातेवाईकांची न्यायालयात बाजू लावून धरली त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.

आझाद यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की , काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील आपली जागा शरणागती पत्करल्याप्रमाणे भाजपला आणि राज्यातील जागा प्रादेशिक पक्षांनी दिली. पक्षाप्रती अजिबातगंभीर नसलेल्यांच्या हाती पक्षाची सूत्रे गेल्याने काँग्रेसवर ही परिस्थिती ओढावली. पक्षांतर्गत निवडणुका हा एक बोगस प्रकार असल्याची टीकाही आझाद यांनी केली आहे.