
मतचोरी व एसआयआरच्या विरोधात बिहार ढवळून काढणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेचा समारोप सोमवारी पाटण्यात होणार आहे. यानिमित्ताने राहुल यांच्यासह तेजस्वी यादव व महागठबंधनचे नेते पदयात्रा काढणार आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने देशात मतचोरी होत असल्याचे पुरावेच काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. त्यावरून देशात प्रचंड गदारोळ झाला. बिहारमधील एसआयआरविरोधाला धार चढली. या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू झाली. बिहारच्या 25 जिह्यांतील 110 विधानसभा मतदारसंघांतून 1300 किमीचा प्रवास करून ही यात्रा सोमवारी पाटण्यात पोहोचणार आहे. तेथे तिचा समारोप होईल.
राहुल गांधी यांची खास पोस्ट
यात्रेच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ पोस्ट केली आहे. ‘बिहारचे खूप खूप आभार. मनापासून प्रेम’ असे राहुल यांनी म्हटले आहे.