भाजप हा धर्मांधतेचा व्हायरस बनविणारा पक्ष – सचिन सावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक महामारी पसरविणाऱ्या कोरोना संसर्गाचा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला. त्याचप्रमाणे धर्मांधता आणि द्वेष पसरविणारा व्हायरस तयार करणारा भाजप हा मनुवादी विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे या देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारानिमित्त ते आज कोल्हापुरात आले होते.

पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली ही छत्रपती शाहूंची तसेच बलाढय़ अशा औरंगजेबाविरोधात पदर खोचून लढणाऱया कर्तबगार, लढवय्या अशा रणरागिनी छत्रपती ताराराणी यांची ही भूमी आहे. मात्र, आज याच भूमीतील महिलांच्या कर्तबगारीवर भाजपच्या नेत्यांकडून अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. यापूर्वीही भाजपच्या नेत्यांनी वीरपत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने संसदेत बोलू दिले नाही, त्यावेळी महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजे यांना कितीवेळा भेट दिली, असा सवाल उपस्थित करत आज दिल्लीत छत्रपतींच्या वारसांचा अवमान करण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.