सर्वसहमतीने राहुल गांधी यांचा उत्तराधिकारी ठरेना, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधीनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल गांधी यांच्यानंतर पक्षाची धुरा कुणाकडे सोपवायची याबाबत पक्षात एकमत होत नसल्याने अध्यक्ष कसा निवडायचा असा पेच काँग्रेसपुढे निर्माण झाला असून अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे

राहुल गांधी यांनी राजीनामा परत घ्यावा यासाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी मनधरणी करून पाहिली. तसेच प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपविण्याचा आग्रह धरण्यात आला, मात्र राहुल गांधी यांनी यापुढील अध्यक्ष गांधी कुटुंबातील नसेल असे स्पष्ट करत नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात यावी अशी सूचना केली आहे. त्यानुसार गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, मुकुल वासनिव आणि आनंद शर्मा यांनी काँग्रेसश्रेष्ठीच्या वतीने नव्या नेत्याच्या निवडीसाठी पक्षाच्या अन्य नेत्यांशी सल्लामसलत केली, पण सर्वसहमतीने नेता निवडण्याची ही प्रक्रिया काही केल्या पुढे जात नसल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचा पर्याय पुढे आला आहे.

दरम्यान, काँगेस अध्यक्षाच्या निवडीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिल्यास कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये, काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसारच नव्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पाडली जावी याची पुरेपूर काळजी काँग्रेस वर्किंग कमिटीकडून घेतली जात आहे. यासंदर्भात या आठवडय़ात होणारी बैठक 22 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अध्यक्षांच्या जोडीला कार्याध्यक्षही

सीताराम केसरींच्या काळात अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. निवडणुकीने अध्यक्षपदाची निवड होताना गटबाजीचाही धोका असतो. त्यातच काँग्रेस इतकी दुबळी झालीय की, उघडपणे अशी लढाई झाल्यास त्याचा पक्षाला फटका बसू शकेल अशी चिंता पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांना आहे. महाराष्ट्रात जसे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले, हाच पॅटर्न देशपातळीवर लागू करायचा का? याबाबतही पक्षात गांभीर्याने विचार सुरू आहे.