करवीरचे काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील तथा पी. एन. पाटील (71) यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालावली. रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. येथील ऍस्टर आधार रुग्णालयात शस्त्र्ाक्रिया होऊन अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

करवीर तालुक्यातील सडोली खालसा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पी. एन. पाटील यांच्या निधनाने राजकीयसह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून आमदार पी. एन. पाटील यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्यासह शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले.