
सामना प्रतिनिधी । हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी लावल्यामुळे काँग्रेस आमदार संतोष टारफे यांचे स्वीय्य सहायक श्रीनिवास नितनवरे व शेवाळ्याचे सरपंच अभय सावंत यांच्यासह इतरांनी शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचे शिवसेनेच्या जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले. दरम्यान, शिवराणी नरवाडे यांच्या फिर्यादीवरुन याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी सांगितले आहे. तर नितनवरे यांना मारहाण केल्याचा कांगावा करत पोलीसात तक्रार दाखल करुन या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडुन सुरु आहे.
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील ग्रामपंचायतीच्या स्मशानभुमीच्या कामासंदर्भात शासकीय निर्देश व नियमांचे पालन न करता हे काम करण्यात आल्याचा आक्षेप घेणारी तक्रार जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली होती. शिवसेनेच्या जि.प. अध्यक्षा शिवराणी प्रकाश नरवाडे व कळमनुरी पंचायत समितीचे शिवसेना उपसभापती गोपु पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला या कामाच्या चौकशीबाबत पाठपुरावा केला होता. जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे या आज त्यांच्या दालनामध्ये दैनंदिन कामकाज करत होत्या. त्यावेळी काँग्रेस आमदारांचे स्वीय सहायक श्रीनिवास नितनवरे व सरपंच अभय सावंत हे अन्य चार-पाच जणांसह अध्यक्षांचे दालनात आले. त्यावेळी या दोघांनी तुम्ही आमची चौकशी कशी काय लावली, आमच्या मागे आमदार-खासदार आहेत, तुमची जात काय, शेवाळ्यात कशा येता ते पाहतो असे म्हणुन दमदाटी केल्याचे शिवराणी नरवाडे यांनी पोलीसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे. ही माहिती समजताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे तातडीने जिल्हा परिषदेत दाखल झाले.
जिल्हाप्रमुख बांगर यांनी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांना तुम्ही आमच्या भगिनी आहात, घाबरुन जाऊ नका असे म्हणत धीर दिला. तसेच युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, शिवसेनेचे जि.प. सदस्य बाळासाहेब मगर, भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर शिंदे, उध्दवराव गायकवाड, राम कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. संतप्त शिवसैनिकांना सर्व प्रमुख पदाधिकार्यांनी शांततेत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे लक्षात येताच काँग्रेसनेही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. तसेच श्रीनिवास नितनवरे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा कांगावा करण्यात आला. आमदार संतोष टारफे यांच्यासह काँग्रेसच्या अन्य मंडळींनी जिल्हा परिषदेत येऊन मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी अतिरिक्त सीईओ मुकीम देशमुख यांच्याकडे केली. मात्र, हा प्रकार घडलाच नसल्याने सीसीटीव्हीत आला नाही. त्यानंतर जिल्हा परिषद कर्मचार्यांमार्फत शिवसैनिकांविरुध्द फिर्याद द्यावी, असा दबाव आणण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर व अन्य पदाधिकार्यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन हकीकत सांगितली. नरवाडे यांनी नितनवरे व अभय सावंत या दोघाविरुध्द फिर्याद दिली असुन गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.
शिवसेना समोरुन वार करते – जिल्हाप्रमुख संतोष बांगर
काँग्रेस आमदाराच्या स्वीय सहायकाला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची अफवा पसरल्यावर पत्रकारांनी जिल्हा परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शिवसेना कधीच पाठीमागुन वार करत नाही तर समोरुन वार करते, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

































































