लोकसभा निवडणुकांपूर्वी पुलवामासारखा हल्ला होऊ शकतो, पद्मश्री दया पवार पुरस्कारांचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2002 सालची गोध्रा दुर्घटना ते 2019 चा पुलवामा हल्ला या दरम्यान प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठी दुर्घटना घडलेली आहे. हा निव्वळ योगायोग नाही. म्हणून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पॅलेस्टिनच्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी पाकिस्तानची कुरापत काढू शकतात, असा खळबळजनक दावा काँग्रेस खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गुरुवारी ‘पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान’चे वर्ष 2023 चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी केतकर बोलत होते. भाषातज्ञ गणेश देवी आणि काँग्रेसचे गुजरातमधील आमदार व दलित कार्यकर्ते जिग्नेश मेवाणी यांना ‘दया पवार पुरस्कार’ तर ‘निळय़ा-काळय़ा रेषा’ आत्मकथनाचे लेखक राजू बाविस्कर यांना ‘ग्रंथाली’च्या ‘बलुतं’ पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना केतकर म्हणाले, साम्यवाद आणि गांधीवाद यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न कवी नामदेव ढसाळ यांनी केले. त्याचे प्रॉडक्ट म्हणजे दया पवार होत. दलित चळवळ जोपर्यंत जीवनमरणाचे प्रश्न मांडत नाही तोपर्यंत आंबेडकरी उत्सव निरर्थक आहेत. देशात जे काही चालले आहे, त्याने चळवळींनी अंतर्मुख व्हायला हवे. अंतर्मुख झालो तरच बंड होते. 2024 च्या निवडणुकांत जरी सत्तापरिर्वतन झाले तरी घटनात्मक संस्थांमध्ये माणसे संघ परिवाराची असणार आहेत. सत्ता तुमची पण देश त्यांच्या ताब्यात अशी स्थिती असेल. त्यामुळे आपल्याला संघर्षाला तयार राहायले पाहिजे, असा सल्ला केतकर यांनी दिला. या सोहळय़ात नेहा कुलकर्णी व अक्षय शिंपी यांनी ‘सदाचार की ताबीज’ याचे सादरीकरण केले. हिरा दया पवार यांनी दया पवार यांची ‘बाई मी धरणं… धरणं बांधते’ ही कविता गायली. चव्हाण सेंटरचे दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी मानपत्राचे वाचन केले. अलका धुपकर यांनी सूत्रसंचालन केले.