चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीत महाराष्ट्राबाबत भेदभाव का? काँग्रेस, राष्ट्रवादीकडून  सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तौकते चक्रीवादळाचा तडाखा गुजरात, केरळ आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना बसला. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचाच दौरा केला आणि तातडीने 1 हजार कोटींची मदतही जाहीर केली. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्रबाबत हा भेदभाव का? अन्य राज्यांतील पीडित जनतेच्या प्रति आपली कांही जबाबदारी नाही का, असा सवाल करून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करण्यात येत आहे.

तौकते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्ये प्रभावित झाली आहेत. पण प्रधानमंत्री मोदींनी फक्त गुजरातचा दौरा केला व त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव का ? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली कांही जबाबदारी नाही का? ते गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे केला आहे.

महाराष्ट्राला सापत्न वागणूक का?

तौकते चक्रीवादळाचा तडाखा गुजरात, केरळ आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांना बसला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा दौरा करून गुजरातलाच एक हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत का केली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवत्ते महेश तपासे यांनी आज केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत चक्रीवादळाने झालेल्या नुकसानभरपाईबाबत कवडीची मदतच काय पण विचारपूसदेखील केली नाही, अशी खंतही तपासे यांनी व्यक्त केली.

 महाराष्ट्रालासुद्धा मदत मिळणार – फडणवीस

तौकते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तौकते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे कालच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे.’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाड येथे दौऱयादरम्यान केला.