
विधानसभा निवडणुकीसाठी अखेर काँगेस-राष्ट्रवादीचे जमले. या आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी प्रत्येकी 125 तर मित्रपक्ष 38 जागा लढवणार असल्याची माहिती काँगेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
दोन्ही पक्ष 125-125 जागा लढविणार असून या जागांमधील 5 ते 6 जागा अशा आहेत ज्या राष्ट्रवादीकडे आहेत आणि काँग्रेस त्या मागत आहे. शिवाय अशाच काही काँगेसकडील जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. त्या जागांची बैठकीत अदलाबदली होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो असतो तर निकाल वेगळा लागला असता. म्हणूनच मागची चूक आता न करता आघाडीवर शिक्कामोर्तब केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेसचा विश्वास आमदारांवरच
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जोरबैठका सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने पुन्हा आपल्या आमदारांवरच विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसच्या सीईसी अर्थात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 60 नावे फायनल करण्यात आली आहेत. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारी तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत उमेदवारांच्या नावांच्या निश्चितीबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर विद्यमान आमदारांनाच निवडणूक लढविण्याची संधी देण्याचा निर्णय झाला. म्हणजेच काँग्रेसकडून यंदा कुठल्याच आमदाराचे तिकीट कापले जाणार नाही. बैठकीला काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, अंबिका सोनी, वीरप्पा मोईली, ज्योतिरादित्य सिंधीया, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जागांबाबत अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचेही ते म्हणाले.
उमेदवारांच्या यादीतील 90 टक्के नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसच्या छाननी समितीने जी नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली त्यापैकी 90 टक्के नावांना मान्यता देण्यात आली आहे. याप्रकरणी छाननी समितीची बैठक 17 सप्टेंबर रोजी तर सीईसीची बैठक 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत आणखी नावे फायनल करण्यात येणार आहेत. दरम्यान, या बैठकीत महाराष्ट्रातील 125 नावांवर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.




























































