पंजाबपाठोपाठ हरयाणातही काँग्रेसमध्ये असंतोषाचा उद्रेक, कुमारी सैलजा यांच्याविरोधात बंडाचा झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये तिथले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील संघर्षामुळे काँग्रेस नेतृत्व चिंतेत पडलेलं आहे. पंजाबपाठोपाठ हरयाणामध्येही काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली आहे. या संघर्षामुळे हरयाणा काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आलं आहे. तिथले माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या समर्थक आमदारांनी हरयाणा काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी सैलजा यांच्याविरोधातील नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. तिथल्या 19 आमदारांनी ही नाराजी काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांच्याकडे बोलून दाखवली आहे. या आमदारांनी वेणूगोपाल यांची सोमवारी भेट घेतली होती आणि या भेटीदरम्यान त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली.

हुड्डा समर्थक आमदारांनी वेणूगोपाल यांची भेट घेण्याआधी कुमारी सैलजा यांनीही वेणूगोपाल यांची भेट घेतली होती. या सगळ्या वादाबाबात सैलजा यांनी तिखट शब्दात टीका केली आहे. सैलजा यांनी म्हटलंय की “माझ्या नसानसांत काँग्रेसचे रक्त आहे. काहींच्या शरीरात काँग्रेसचे कमी रक्त असू शकते. काँग्रेस मोठा पक्ष आहे, नेते येत-जात असतात. मी जन्मापासून काँग्रेसी आहे. माझ्या पूर्वजांनी कधीही काँग्रेस पक्ष सोडला नव्हता.”

सैलजा यांच्या कार्यपद्धतीवर हुड्डा समर्थक नाराज असून त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सैलजा यांच्याकडून काढून घेऊन माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्याकडे सोपवावीत अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. असं न झाल्यास हरयाणात काँग्रेस पक्ष संकटात सापडेल अशी भीती हुड्डा समर्थकांना वाटते आहे. हरयाणामध्ये काँग्रेसचे 31 आमदार आहेत, ज्यातील 19 आमदार हे हुड्डा समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. हुड्डा हे काँग्रेसचे विधीमंडळातील नेतेही आहेत.