महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, संसदेत प्रचंड गदारोळ ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदीय परंपरा मोडीत काढत, साधनसूचिता, नीतिमत्ता गुंडाळत ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंदीपदाची शपथ घेतली त्याचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. दिल्लीश्वरांच्या दंडेलशाहीविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले. ‘लोकतंत्र बचाओ, महाराष्ट्र बचाओ.’ ‘महाराष्ट्र में गव्हर्नर की तानाशाही नही चलेंगी’, अशा जोरदार घाषणा देत भाजपच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध केला. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. घोषणाबाजी, गदारोळात दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तरांचा तास पुकारला गेला. यावेळी अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थिनींसंदर्भातील एक पूरक प्रश्न विचारण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उभे राहिले. ‘‘महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे, आता माझा प्रश्न विचारण्यात काहीच हशील नाही’’ असे राहुल गांधी यांनी यावेळी उद्वेगाने सांगितले. त्यानंतर लोकसभेत गदारोळाला सुरुवात झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टीच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन जोरजोरात ‘लोकतंत्र बचाओ, महाराष्ट्र बचाओ.’ ‘महाराष्ट्र में गव्हर्नर की तानाशाही नही चलेंगी’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सुरुवातीला दुपारी 2 पर्यंत तहकूब केले. त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने तालिका सभापती मीनाक्षी लेखी यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

राज्यसभेतही पडसाद

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचे तीव्र पडसाद राज्यसभेतही उमटले. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व उपनेते आनंद शर्मा यांनी महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा भाजपने कसा घोटला, त्यासाठी सरकारी यंत्रणांना कसे वेठीला धरले गेले यावर बोलण्यास सुरुवात केली. त्याला सत्तापक्षाच्या खासदारांनी विरोध दर्शविला. राज्यसभेत माकपाच्या बिनाय विस्वम यांनी महाराष्ट्रासंदर्भात तहकुबी सूचना मांडली होती.  काँग्रेस, डावे पक्ष आणि सर्व विरोधकांनी चर्चेची मागणी केली. ही मागणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली. त्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वेलमध्ये जमले व घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे कामकाज दुपारी 2 पर्यंत सभापती वेंकय्या नायडू यांनी तहकूब केले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली मात्र गदारोळ कायम राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून गुपचूप शपथविधी झाला, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याशेजारी आंदोलन केले. यावेळी काळ्या फिती लावून विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शने केली व घोषणाबाजी केली. त्यात घोषणा देण्यात सोनिया गांधी आघाडीवर होत्या.

तृणमूलचा महाराष्ट्रासाठी आवाज

लोकसभेत महाराष्ट्रातील घडामोडींवर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. तृणमूलचे खासदार भाजपविरोधी घोषणाबाजीत आघाडीवर होते. त्यातही कल्याण बॅनर्जी यांच्या आक्रमक घोषणाबाजीने लोकसभा दणाणून गेली. ‘महाराष्ट्र में गव्हर्नर की तानाशाही नही चलेगी’ ही बॅनर्जींची घोषणा चांगलीच गाजली.