आता निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करेल का? काँग्रेसचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे खासदार डी. अरविंद यांनी ईव्हीएम मशीनबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. मतदान कोणालाही केले तरी मोदीच जिंकणार. ईव्हीएमवर कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी निवडणूक आयोग आता यावर कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे.

काँग्रेसने ट्विटरवरून एक व्हिडीओ अपलोड करत भाजपवर निशाणा साधला आहे. ”ई्व्हीएम आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत आतापर्यंत बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. मात्र आता भाजप खासदार डि अरविंद यांनी हे मान्य केलं आहे. स्वत: भाजपने आता हे मान्य केले आहे की ईव्हीएम हायजॅक केले जातेय. हे आता लोकांना निर्लज्जपणे भाजपला व्होट द्यायला धमकावत आहेत. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. त्य़ांनी अशी सेटिंग केलीय की तुम्ही कुणालाही मत द्या भाजपलाच मत जाणार, असे काँग्रेसने या व्हिडीओत म्हटले आहे.

”2014 नंतर निवडणूक काळात जागोजागी ट्रकटेम्पोमध्ये ईव्हीएम मशीन सापडत होते. एका आयरटीआयनुसार 2016 ते 2018 च्या दरम्यान देशात 19 लाख ईव्हीएम गायब झाले आहेत. ईव्हीएमध्ये गडबड असल्याने निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मशीन आणल्या पण नंतर समजलं की त्यापैकी सहा लाख मशीन या नादुरुस्त होत्या. त्यावरून कळतं की संपूर्ण निवडणूक प्रक्रीयेला भाजपची वाळवी लागली आहे.” यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला आहे.

”सर्व संस्थाना आपल्या ताब्यात करणारी भाजप ही देशासाठी संकटच आहेत. निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणूकीवर कायम राहायला हवे. त्यामुळे आता ते भाजपवर काय कारवाई करणार” असा सवाल काँग्रेसने केला आहे.