निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले! राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी होतना पाहिले आणि त्याने चोरांना वाचवले. पहाटे ४ वाजता उठायचे, ३६ सेकंदात दोन मतदारांची नावे हटवायची आणि मग पुन्हा झोपून जायचे, अशा प्रकारे वोटचोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी मतचोरीच्या मुद्द्यावरून मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर सतत हल्ला करत आहेत. त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत वोटचोरी आणि मतपत्रिकेतील नावे डिलीट करणे, मते डिलीट करणे अशा झाल्याचे सांगत पुराव्यासह निवडणूक आयोगाची पोलखोल केली. आता त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. शुक्रवारी त्यांनी एक सादरीकरण शेअर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

याबाबत राहुल गांधी यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, पहाटे ४ वाजता उठायचे, 36 सेकंदात दोन मतदारांची नावे डिलीट करायची आणि पुन्हा झोपून जायचे, अशा प्रकारे वोटचोरी झाली आहे. निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले. निवडणूक आयोग जाणूनबुजून काँग्रेसच्या मतादारांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे वगळत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले. आयोगाने म्हटले आहे की कोणताही नागरिक कोणाचेही मत ऑनलाइन डिलीट करू शकत नाही. मत डिलीट करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.