
भाजपा सरकारच्या बेजबाबदार वागणुकीमुळे देशात आर्थिक आणिबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना कर्जाच्या दुष्टचक्रात ढकलले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सरकारने वाढवलेल्या महागाईविरोधात लढा देणार असून, आजची निषेधात्मक सायकल रॅली ही भाजपसरकारविरोधातील नवक्रांतीचीच सुरुवात आहे, असे प्रतिपादन गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.
पेट्रोल प्रति लिटर 60 रुपयात देण्याचे आश्वासन देत भाजप सरकार 2012 मध्ये सत्तेवर आले. मात्र, आज गोव्यात पेट्रोल शंभरीला पोहोचले असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले. मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानावर राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला वंदन करून काँग्रेसच्या महागाईविरोधातील निषेधात्मक सायकल रॅलीला सुरुवात झाली. यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, नुवेचे माजी आमदार आलेक्स सिक्वेरा, काँग्रेसचे उपाध्यक्ष आल्तिनो गोम्स, द. गोवा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, मडगाव गट काँग्रेस अध्यक्ष गोपाळ नाईक, मडगाव पालिकेच्या उपाध्यक्षा दीपाली सावळ आदी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. ही सायकल रॅली दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आली.
विविध करांचा अधिभार लावून इंधन दरवाढ केल्यामुळे भाजप सरकार जनतेला लुटण्याचेच काम करत आहे. जनतेकडून लुटला जाणारा हा सगळा पैसा नेमका जातोय कुठे? असा सवाल गिरीश चोडणकर यांनी केला. कोविडच्या काळात जनतेला सोसाव्या लागलेल्या त्रासाची कल्पना भाजप सरकारला नाही. जनतेची थोडी जरी काळजी असेल, तर सरकारने केलेली इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी लुईझिन फालेरो यांनी केली.
वारंवार केली जाणारी इंधन दरवाढ ही भाजप सरकारच्या असंवेदनशीलपणाचेच द्योतक आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दु:खासोबत आपले कसलेही नाते नाही हेच यातून भाजप सरकार सांगत आहे, असे ज्यो डायस म्हणाले. महागाईविरोधात गोवा काँग्रेसने आयोजित केलेली आजची निषेधात्मक सायकल रॅली मोदी सरकारविरोधातील राष्ट्रीय निषेध कार्यक्रमाचा भाग असून, आजच्या या तिसऱ्या निषेध मोर्चापूर्वी महिला आणि युवा काँग्रेसच्यावतीने 8 जुलै रोजी सांखळी, डिचोली, वाळपईमध्ये ‘ढोल वादन’ करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सांखळीमध्ये 9 जुलैरोजी बैलगाडी रॅली काढून महागाईचा निषेध नोंदवला होता. जोपर्यंत सरकार इंधन दरवाढ मागे घेत नाही तोवर राज्यभरात असे निषेध कार्यक्रमाचे घेण्यात येतील, असे यावेळी आल्तिनो गोम्स यांनी सांगितले.

























































