
इचलकरंजीत मताधिक्य मिळूनही शिंदे गटाला आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नाही. भाजप ज्या ज्या ठिकाणी मैत्री करतो, त्या त्या ठिकाणी मित्रपक्षांना संपवणे हाच भाजपचा एकमेव आणि खरा अजेंडा आहे, अशा शब्दांत जोरदार टीका काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ ही काँग्रेसची टॅगलाइन केवळ घोषणा नसून आगामी महापालिका निवडणुकीसाठीचा संपूर्ण विकास आराखडा जनतेच्या सहभागातून तयार केला जाणार असल्याचे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेसने विशेष मोहीम हाती घेतली असून कोल्हापूरकरांच्या मनातील भावना, अपेक्षा आणि गरजा थेट ऐकून त्यावर आधारित विकासाचा रोडमॅप ठरवला जाईल, असे त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकाच्या माध्यमातून कोल्हापूर महापालिकेवर राज्य सरकारची सत्ता आहे. मात्र या काळात शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. कोल्हापूरची जी धूळधाण झाली आहे, ती जनतेसमोर आहे, असेही ते या वेळी म्हणाले.
शिंदे गट असो की अजित पवार यांचा गट असो, या दोघांनाही भाजपने त्यांची जागा दाखवली आहे. कारण भाजप मित्रपक्षांना संपवतो हेच खरे आहे, असे ते म्हणाले. प्रस्तावित वीज दरवाढीच्या मुद्दय़ावर सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. अवास्तव वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी सूचना एनईआरसीने दिली असतानाही राज्य सरकारने ती दुर्लक्षित करून पुन्हा दरवाढ केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने या सुनावण्यांना उपस्थित राहून प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध केला पाहिजे. 8 तारखेला पुण्यात पश्चिम महाराष्ट्राची सुनावणी असून त्या सुनावणीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.




























































