
‘एक डरपोक राजा है हमारे हिंदुस्तान में, जब उसे डर लगता है वो सहम जाता है, घबरा जाता है..’, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असा थेट हल्ला करणारा व्हिडीओ सोमवारी एक्स आणि इतर समाज माध्यमांवर काँग्रेसने रिलिज केल्यानंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून साम, दंड, भेद अशा सर्व नीतींचा अवलंब केला जात असतानाच काँग्रेसने या व्हिडीओद्वारे भाजपची हवा टाईट केली आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर नवीन वर्षात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यासाठी इंडिया आणि भारत अशा दोन राजकीय आघाडय़ांवर मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपइतकाच सोशल मीडियाचाही प्रभावी वापर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सुरू केला आहे.
व्हिडीओ अनेकांकडून रिपोस्ट
काँग्रेसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी रिपोस्टही केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपासयंत्रणांचा गैरवापर करतात असा आरोप राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी याआधीही केला आहे. राहुल गांधींना पप्पू पप्पू.. म्हणत सोशल मीडियावर ट्रोल करणाऱया भाजपने राहुल यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका घेतला असतानाच, काँग्रेसनेही सोशल मीडियावर मोदींना थेट टार्गेट करत डरपोक राजा असे कँपेनच सुरू केले आहे.
तानाशहा है, ढोंगी है…
… वो एक तानाशहा है, ढोंगी है, डरपोक है… असे मोदींविषयी बोलणाऱया या व्हिडीओत, निवडणूक आली की काँग्रेसचा विजय होणार या भीतीने तो राजा गर्भगळीत होतो. त्यामुळेच हा राजा सरकारी एजन्सींचा दुरुपयोग करतो. विरोधकांना घाबरवण्यासाठी हा राजा ईडी, आयटी आणि सीबीआयच्या अधिकाऱयांना पाठवतो. मात्र काँग्रेस पक्ष कुणालाच घाबरत नाही. कारण काँग्रेस हा तो पक्ष आहे ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसेच इंग्रजांना धूळ चारली. आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही तर त्यांच्या गुलामांना कसे घाबरु? अशा आशयाचा हिंदी मेसेज या व्हिडीओद्वारे दाखवण्यात आला आहे.

























































