प्रत्येक घरांना नळजोडणी देणारे गोवा पहिले राज्य असल्याची घोषणा म्हणजे भाजपचा जुमला; काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यातील प्रत्येक ग्रामीण घरांना 100 टक्के नळ जोडणी पुरवणारे गोवा हे ‘हर घर जल’ योजनेतील पहिले राज्य असल्याचा केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचा दावा म्हणजे भाजपचा जुमला असल्याची टीका उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके यांनी केली आहे. आजही अनेक गावातील लोक विहीरीवरील किंवा जवळच्या नदी-ओढ्यातील पाणी वापरत आहेत. तर शहरातील लोक कोरड्या नळांमुळे हवालदील झाल्याचा दावा भिके यांनी केला आहे. म्हापसा शहरात एकतर नळ कोरडे असतात वा गढुळ पाण्याची समस्या लोकांना भेडसावते. पणजी, मडगाव, वास्को व इतर ठिकाणी लोकांना पाण्याची समस्या आहे, याकडे भिके यांनी लक्ष वेधले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यानी गोव्याला भेट द्यावी. आम्ही त्यांना प्रत्येक खेड्यातील व शहरातील नळाच्या पाण्याची समस्या दाखवुन देतो. त्यामुळे ही घोषणा जुमला असल्याचा आरोप त्यांनी केला. गोवा राज्य हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु आजही अनेक ठिकाणी शौचालये उपलब्ध नसल्याने लोक उघड्यावर शौचास जात आहेत. गोवा शंभर टक्के हागणदारी मुक्त झाला असल्यास सरकार अजूनही नवीन शौचालयांची का खरेदी करत आहे असा सवाल काँग्रेसने केला आहे. गोमंतकीय जनता भाजप सरकारच्या जुमलेबाजीला कंटाळली असल्याचे भिके म्हणाले.