नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का? काँग्रेसचा घणाघात

अभिनेता सुशांतसिंह प्रकरणातून बॉलीवूडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणी संबंधीत असलेल्या भाजप -बॉलीवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने उपस्थित केला आहे.

भाजपचे बॉलीवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करता येणार नाही. 59 ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत असताना कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला 1हजार 200 किलो गांजासह अटक करण्यात आली याकडे त्यांनी ढुंकुंनही पाहिले नाही. कर्नाटक भाजपची स्टार प्रचारक असलेली अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला सँडलवूड ड्रग रॅकेट प्रकरणात अटक झाली. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अल्वा हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीपसिंहबरोबर सहनिर्माता आहे. याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लक्ष वेधले.

एनसीबी कंगनावर मेहरबान का?
आपण ड्रग्ज घेत होतो अशी स्वतः कबुली देणारी अभिनेत्री कंगना राणावत एनसीबीच्या ड्रग कनेक्शन चौकशीतून गायबच आहे. कंगनाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हीडीओ हा पुरावा आहे, एनसीबी व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीसाठी बोलावत असेल तर कंगनाच्या व्हिडिओकडे डोळेझाक का ? एनसीबी कंगनावर मेहरबान आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या