‘राम जी’ योजनेवरून लोकसभेत गदारोळ, काँग्रेस खासदारांची जोरदार घोषणाबाजी

यूपीए सरकारच्या कार्यकाळातील ‘मनरेगा’ योजनेचे नामांतर करून त्यातून महात्मा गांधी यांचे नाव वगळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आज संसदेत तीव्र पडसाद उमटले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान ‘व्हीबी जी राम जी’ नावाने नवे विधेयक मांडताच काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. या निर्णयाला तीव्र आक्षेप घेत काँग्रेस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची हमी देणारी योजना यूपीए सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. ही योजना ‘गेमचेंजर’ ठरली होती. लाखो लोकांना यातून आधार मिळाला. या योजनेत किरकोळ बदल करून मोदी सरकारने ‘विकसित भारत जी राम जी’ नावाने नवी योजना आणली आहे. शंभर दिवसांऐवजी सवाशे दिवसांची रोजगार हमी इतकाच बदल नव्या योजनेत आहे. मोठे बदल न करता सादर करण्यात आलेल्या नव्या विधेयकाला काँग्रेस सदस्यांनी विरोध केला.

खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीका केली. ‘लहर आली म्हणून हा कायदा करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींचे अधिकार काढून घेण्याचा सरकारचा डाव आहे’, असा आरोप त्यांनी केला. तर केंद्र सरकारला आता महात्मा गांधींच्या नावाचीही अॅलर्जी झाली आहे, अशी टीका रंजिता रंजन यांनी केली. भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले काँग्रेसचे दोन खासदार शशी थरूर व मनीष तिवारी यांनीही नव्या विधेयकावरून सरकारवर जोरदार टीका केली.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत विरोध करणार – राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. ‘नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींचे विचार आणि गरीबांच्या अधिकारांच्या कायम विरोधात राहिले आहेत. ते या दोन्ही गोष्टींचा द्वेष करतात. ‘मनरेगा’ ही महात्मा गांधींच्या ग्राम स्वराजच्या स्वप्नाचे जिवंत प्रतीक आहे. लाखो गावकऱयांसाठी जीवनरेखा आहे. कोविड-19 महामारीच्या काळात ही योजना ग्रामीण भागाच्या आर्थिक सुरक्षेचे कवच ठरली होती, मात्र मोदींच्या मनात या योजनेबद्दल सुरुवातीपासून अढी आहे. मागच्या दहा वर्षांपासून ही योजना कमकुवत करण्याचा प्रयत्न ते करत होते. आता तर ती योजनाच नष्ट करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. हा गांधींच्या विचारांचा अपमान आहे. सरकारने आधीच बेरोजगारीद्वारे हिंदुस्थानी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. आता गावखेडय़ातील लोकांच्या सुरक्षित जीवनावरच घाला घातला जात आहे. गल्लीपासून संसदेपर्यंत आम्ही या विधेयकाचा विरोध करू, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.