
राज्यातील जनतेमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी राज्यभरात पदयात्रा आणि बसयात्रा काढण्याचा निर्णय आज काँग्रेसने घेतला. या पदयात्रांची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
गांधी भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नागपूर, अमरावती, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई अशा सहा राज्यांमध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते पदयात्रा काढतील. कोकण विभागात हे सर्व नेते एकत्रितपणे पदयात्रा काढतील. या पदयात्रांनंतर बसयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध निर्भीडपणे लढा देणाऱया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मुंबईत भव्य सत्कार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निरीक्षकांची नियुक्ती
राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय हा आढावा घेतला जाणार आहे. तेथील राजकीय परिस्थिती, पक्ष संघटनेची ताकद या सर्वांचा अभ्यास करून 15 ऑगस्टपर्यंत सर्व निरीक्षक प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत.

























































