कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू गोळी लागून, शहीदाचा दर्जा देण्याचा कुटुंबीयांची मागणी

5355

दिल्ली हिंसाचारात कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू दगड लागून नव्हे तर गोळी लागून झाला होता असे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. रतनलाल यांना शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांच्या कुटुबींयांनी केली आहे.

रतनलाल हे राजस्थानचे रहिवासी आहेत. त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचले आहे. रतनलाल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला असून धरणे आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत रतनलाल यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भुमिका त्यांनी घेतली आहे.

दिल्ली हिंसाचारात कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्यांच्या उजव्या खांद्यातून गोळी शिरून डाव्या खांद्यात गेली होती. कॉन्स्टेबल रतनलाल दिल्लीच्या गोकुलपुरी भागात तैनात होते. या भागात CAA विरोधक आणि समर्थकांमध्ये झडप झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात रतनलान जखमी झाले होते आणि त्यांचा मृत्यू झाला.

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हिंदुस्थान दौर्‍यावर असताना हा हिंसाचार उफाळल होता. दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी राज्यात शांतता पाळण्याचे आवाहन केले होते. तसेच मुख्यमंत्री केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. राज्यात हिंसाचार रोखण्यासाठी शांतता समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच सर्व दंगलखोरांवर लक्ष ठेवले जाईल व अधिक सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवानांची संख्या वाढवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या