जन्मदात्रीने रस्त्यावर सोडलं, पण पोलीस महिलेनं दूध पाजलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । बंगळुरू 
प्रत्येक ‘स्त्री’ ही अनंत जन्माची माता असते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय बंगळुरूमधील एका बाळाला आला आहे. जन्मदात्या आईने रस्त्यावर फेकलेल्या त्या काही तासांच्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी एका महिला पोलिसाने कसलाही विचार न करता त्या बाळाला स्वत:च्या छातीशी कवटाळून दूध पाजल्याची घटना कर्नाटकमध्ये उघडकीस आली आहे. डी.एस. अर्चना असे त्या महिलेचे नाव असून तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अर्चना यांना पाच महिन्याचे बाळ असून त्या नुकत्याच गरोदरपणाच्या रजेवरून पुन्हा रुजू झाल्या आहेत.
१ जून रोजी बंगळुरूमधील दोडाथगुरू भागाातील एका इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी एक बेवारस बाळ सापडल्याचे एका व्यक्तीने पोलिसांना कळविले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलीस ठाण्याचे पोलीस पथे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी एका प्लास्टिकच्या पिशवीत एक बाळ गुंडाळून ठेवल्याचे त्यांना आढळून आले. पोलिसांच्या पथकात असलेल्या अर्चना यांनी त्या बाळाला स्वत:च्या पदरात घेऊन छातीशी कवटाळले. त्यानंतर पोलीस त्या बाळाला घेऊन रुग्णालयात गेले. डॉक्टर त्या बाळावर उपचार करत असतानाच बाळ जोरजोरात रडू लागले. त्यावेळी बाळासोबत रुग्णालयातच थांबलेल्या अर्चना यांनी बाळाला शांत करण्यासाठी कसलाही विचार न करता बाळाला स्वत:चे दूध पाजले. आईच्या दूधाची आश धरून बसलेल्या त्या बाळाला अर्चना यांनी दूध पाजल्याने ते देखील शांत झाले व लगेच झोपून गेले. अर्चना यांच्या या उदार मातृत्वाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी देखील कौतुक केले आहे.
‘माझं बाळ अशिष्ट देखील पाच महिन्याचा आहे. त्या बाळाला असं बेवारस टाकलेलं बघून मला फार वाईट वाटलं. ते बाळ सतत रडत होतं. त्या बाळाला भूक लागली होती म्हणूनच ते रडत होतं. माझ्यातलं मातृत्व मला त्या बाळाला रडताना बघून शांत कसं राहू देणार होतं. त्यामुळे पुढचा मागचा कसलाही विचार न करता मी त्या बाळाला दूध पाजलं. मी याहून जास्त त्या बाळासाठी काय करणार होते. जेव्हा मी त्या बाळाला दूध पाजत होते तेव्हा मला मी माझ्य अशिष्टलाच दूध पाजतेय असे वाटले’, असं अर्चनाने प्रसारमाध्यमांना सांगितले.
सदर बाळावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला शिशू विहारमध्ये पाठविण्यात आले असून पोलीस या बाळाच्या पालकांचा शोध घेत आहेत.