नक्षलवाद्यांच्या हाती बंदुकीऐवजी संविधान; ही माओवाद्यांच्या शेवटाची सुरुवात -देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील गडचिरोलीसह आसपासच्या राज्यांत सक्रिय असलेल्या 61 नक्षलवाद्यांनी आज पोलिसांपुढे शरणागती पत्करली. नक्षलवाद्यांचा एक प्रमुख नेता मलोजुला वेणूगोपाल राव ऊर्फ भूपती याचाही यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नक्षलवाद्यांच्या बंदुका जमा करण्यात आल्या व त्यांच्या हाती संविधानाची प्रत देण्यात आली. भूपतीची शरणागती ही माओवादी चळवळीच्या शेवटाची सुरुवात आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

नक्षल चळवळीच्या विरोधात लढण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा अभिमान आहे. आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नक्षलवादी सक्रिय आहेत. त्यांनीही शरण यायला हवे, नाहीतर त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असे फडणवीस म्हणाले. येत्या काही दिवसांत छत्तीसगड, तेलंगणामधील ‘लाल कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जाणारा प्रदेशही नक्षलमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शरणार्थींचे योग्य पुनर्वसन करणार

फडणवीस यांनी यावेळी गडचिरोली पोलिसांच्या शौर्याचे काwतुक केले. शरण आलेल्या नक्षलवाद्यांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘नक्षलवाद संपण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे काही लोक पुन्हा हल्ला करून अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा  प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पोलीस यंत्रणेने व सर्वसामान्य नागरिकांनीही सावध राहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.