
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पूर्वी परदेशात नोकरीला लावतो, बँकेतून बोलतोय असे सांगून फसवणूक करणार्या भामटय़ानी नवीन शक्कल शोधून काढली आहे. तक्रारदार यांनी गेल्या आठवडय़ात इंटरनेटवर घराजवळील वाइन शॉपची माहिती सर्च केली तेव्हा त्यांना एक नंबर दिसला. त्या नंबरवर तक्रारदारांनी फोन केला तेव्हा सायबर भामटय़ाने वाइन शॉपचा कर्मचारी असल्याचे भासवले. ऍडव्हान्स पेमेंट म्हणून 640 रुपये द्यावे लागतील असे तक्रारदारांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी सीव्हीसी नंबर आणि ओटीपी दिला. ओटीपी दिल्यावर त्यांच्या बँक खात्यातून 21 हजार 700 रुपये काढले गेले. फसवणूक लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठले तेव्हा अशाच प्रकारे एका बँकर्सलाही सायबर भामटय़ाने चुना लावल्याचे समजले.




























































