भरधाव कंटेनरने रिक्षाला उडवले, एक ठार, तीन गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

बाभळगाव नाक्यावर अ‍ॅटोरिक्षा-कंटेनरच्या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुभंम मधुकर घोडके (19 रा. आनंद नगर, लातूर) असे मृत्यू झालेल्या अ‍ॅटोचालकाचे नाव आहे तर जखमींमध्ये महेश संग्राम तेलंगे (वय 21 रा. शिरुर अनंतपाळ), रोहिणी कुमार मस्के (वय 18 रा सारोळा ता. लातूर) व दिव्या मोहन मस्के (वय 19 रा सारोळा ता. लातूर) या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी हे तीन विद्यार्थी पोलीस क्वार्टरपासून अ‍ॅटोरिक्षाने शाहू महाविद्यालयाकडे जात होते. दरम्यान, बाभळगाव नाक्यावर रस्ता ओलांडत असताना समोरून भरधावात येत असलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली. यामध्ये अ‍ॅटोरिक्षा चालक शुभंम घोडके यांचा जागीच मृत्यू झाला तर महेश संग्राम तेलंगे हा गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रोहिणी आणि दिव्या या दोघींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.