दिल्लीत कंत्राटी शिक्षकांचे हाल; कोणी भाजी विकतंय तर कोणी सायकल दुरुस्त करतंय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात अनेक उद्योग, व्यवसाय अजूनही ठप्प आहे. यात मजुरांचे चांगलेच हाल झालेत आहेत. शिक्षण क्षेत्राला देखील याचा परिणाम सहन करावा लागत असून शिक्षकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. दिल्लीतील कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या शिक्षकांकडे काम नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घर चालवण्यासाठी काही शिक्षकांनी भाजी विकण्यास सुरूवात केली आहे, तर काहींनी सायकल दुरुस्त करण्यास सुरूवात केली आहे. काहींनी गावी जाऊन शेतीही करायला घेतली आहे.

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. दिल्लीच्या एक हजार 30 सरकारी शाळांमध्ये 20 हजारहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यात कंत्राटी पद्धतीवर शिकवणार्‍या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना दर दिवसाला एक हजार 40 ते 1400 रुपये मानधन दिले जाते. दर वर्षी त्यांचे कंत्राट वाढवले जाते. या शिक्षकांना कुठल्याही सुटीचा मोबदला दिला जात नाही. पगारी शिक्षकांना ज्या ज्या सुविधा असतात या सुविधा या शिक्षकांना मिळत नाही. कोरोना संकटामुळे या शिक्षकांचे चांगलेच हाल झाले आहेत.

5 मे रोजी दिल्ली सरकारने एक सूचना जारी केली. त्यानुसार सर्व कंत्राटी शिक्षकांना 8 मे 2020 पर्यंत त्यांचे मानधन दिले जाईल. तसेच उन्हाळ्च्या सुटीत जर त्यांना कामाल बोलवले तर त्याचेही पैसे देण्यात येतील. कोरोनामुळे सगळ्या शाळा बंद असल्याने या शिक्षकांना बोलवण्यात आले नाही.

19 मार्च पासून दिल्लीत सगळ्या शाळा बंद आहेत. ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. 11 मे ते 30 जून उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. जे ऑनलाईन वर्ग घेत होते त्यांना मानध देण्याचे सरकारने जाहीर केले होते.

परंतु अनेक कंत्राटी शिक्षकांना हाती काम नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर येत आहे. 34 वर्षीय वझीर सिंह हे इंग्रजीतून एम ए झाले असून ते इंग्रजीचे शिक्षक आहेत. गेली तीन महिने काम नसल्यामुळे त्यांनी हातगाडीवर फळे आणि भाजी विकायला सुरूवात केली आहे. दिवसाला त्यांना दिवसाला 400 ते 500 रुपये मिळतात. तसेच हातगाडीचे महिन्याचे भाडे 2 हजार रुपये इतके आहे. दिवेश कुमार हे बीएससी, एमए आणि बीएड झाले आहेत. कुमार विज्ञान शिकवतात. पण हाती काम नसल्यामुळे ते सध्या ते बाईक आणि सायकल दुरुस्त करत आहेत. संजीव कुमार हे संस्कृतचे शिक्षक आहेत. हाती काम नसल्यामुळे त्यांनी थेट आपले गाव गाठले असून शेती करण्यास सुरूवात केली आहे.

दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की हा प्रश्न सेवा विभागाच्या अंतर्गत येतो. सेवा विभाग नायब राज्यापालांच्या अखत्यारित येतो. याप्रकरणी नायब राज्यपालांकडून काहीच उत्तर आलेले नाही.