
सामना ऑनलाईन । मुंबई
सहकाऱ्यांशी बेशिस्त आणि तोंडाळ वर्तणूक करणाऱ्या एका महिला वकिलाचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लता छेडा असं या वकिलाचं नाव आहे.
सरकारी वकील म्हणून काम करणाऱ्या छेडा यांच्या कंत्राटाच्या नूतनीकरणाची मंजुरी अर्ज विधी आणि न्याय विभागाचे सहसचिव एम. बी. गोसावी यांनी फेटाळला आहे. कारण, लता यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर बेशिस्त वर्तणूक आणि तोंडफाटकेपणाचा आरोप केला आहे. सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, छेडा यांची वागणूक कार्यालयीन शिस्तीला अनुसरून नसते. त्या कनिष्ठांचा पगारही वेळचे वेळी देत नाहीत आणि त्यांच्या कामात सतत ढवळाढवळ करत असतात. या तक्रारींमुळेच छेडा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मागील वर्षी देखील ही लता यांच्यावर याच प्रकारची तक्रार विधी आणि न्याय विभागाकडे करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात लता छेडा यांनी त्यांच्या नव्या कंत्राटाची नूतणीकरण करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज विधी आणि न्याय विभागाने फेटाळला आहे. छेडा यांचे त्यांच्या सहकाऱ्यांशी वागणूक देखील गैर असल्याच्या कारणावरूनच त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आल्याचं विभागाने स्पष्ट केलं आहे.

























































