
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांमध्ये पंधरा-वीस वर्षांपासून कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. तसेच कोरोना महामारीच्या संकटातही वर्षभरापासून ते नियमित वीज कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 40 वीज कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून वीज कंपन्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप भरपाई दिलेली नाही. तसेच पगार वेळेत मिळत नाही. त्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात कंत्राटी वीज कामगार काळ्या फिती बांधून वीज कंपन्यांबरोबरच ऊर्जा विभागाचा निषेध करणार आहेत.
वीज कंपन्यांमधील रिक्त असलेल्या नियमित पदांच्या जागी तब्बल 32 हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. राज्याचा वीज पुरवठा, वीज निर्मिती सुरळीत ठेवणे, वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याचे काम करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंत्राटी वीज कामगारांच्या विविध मागण्यांबाबत वारंवार वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे पत्र व्यवहार करूनही वीज कामगारांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांकडे सरकारबरोबरच ऊर्जा विभाग आणि वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी आज 11 मे रोजी दिवसभर कंत्राटी वीज कामगार काळ्या फिती बांधून काम करणार असल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने स्पष्ट केले आहे.





























































