नगर परिषदेच्या अधिकाऱ्याची लाचखोरी, कंत्राटदाराची थेट पंतप्रधानांकडे तक्रार

303
bribe

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

नगर परिषदेच्या अधिकाऱ्याने लाच मागितल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात केली आहे. अजय जाधव असं या तक्रार करणाऱ्या कंत्राटदाराचं नाव असून किरण कोळंबे या अधिकाऱ्याविरुद्ध त्यांनी लाचखोरीची तक्रार केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जाधव यांनी एका कंत्राटाअंतर्गत अंबरनाथमधील विविध रस्त्यांची कामे केली होती. त्याचे सुमारे 8.5 लाखांचे बिल देणे बाकी होते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी बिल मंजूर केले होते. मात्र, लेखापाल विभागाचे प्रमुख अधिकारी किरण कोळंबे यांनी ते बिल देण्यासाठी लाच मागितली, असा आरोप जाधव यांनी केला आहे. वारंवार विनंती करूनही कोळंबे यांनी बिलाचे पैसे देण्यास नकार दिला. उलट आपल्याला तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्यासाठी हे पैसे हवे असल्याचं कोळंबे यांनी सांगितलं. अखेर जाधव यांनी याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

मुख्याधिकारी देविदास पवार यांनी त्वरित या तक्रारीची दखल घेतली. जाधव यांच्या बिलाचे पैसे त्वरित देत पवार यांनी कोळंबे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कोळंबे यांनी याआधीही लाच घेतल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. कोळंबे यांच्या लाचखोरीच्या पूर्वइतिहासामुळेच पंतप्रधान कार्यालयात तक्रार केल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या