नागपूर महापालिकेत कंत्राटदारांचे भीक मांगो आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

गेल्या आठ महिन्यांपासून कंत्राटदारांना महापालिकेने एकही रुपया दिला नसून सातत्याने करण्यात आलेल्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कंत्राटदारांनी आंदोलन सुरू केले असून आज त्यांनी महापालिका परिसरात भिक मागून लक्ष वेधले. भिकेत जमा झालेली रोख महापौरांना देण्यात येणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनीही जुन्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाची तयारी केली आहे.

कंत्राटदारांनी थकीत बिलांसाठी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते, आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. सातत्याने बिलांसाठी पाठपुरावा केला. परंतु महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचेही हृदय पाझरले नाही. कंत्राटदारांकडे व्यापाऱ्यांना तगादा लावला, त्यात महापालिकेने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त होऊन कंत्राटदारांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळे आंदोलन करून कंत्राटदार लक्ष वेधत आहे. आज तिसऱ्या दिवशी मनपा कॉन्ट्रॅक्‍टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वच कंत्राटदारांनी महापालिकेचे आवार तसेच परिसरातील मिठा निम दर्गापर्यंत भीक मागितली. या भिकेतून कंत्राटदारांना 1460 रुपये मिळाली. ही रोख रक्कम महापौर नंदा जिचकार यांना सोपविण्यात येणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू, उपाध्यक्ष प्रकाश पोतपोसे, सचिव संजीव चौबे, मतीन भाई, प्रशांत ठाकरे, नरेंद्र हटवार, महेश शाहू आदींनी भाग घेतला. दरम्यान, महापालिकेतील कर्मचारीही अनेक वर्षांपासून असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी 21 ऑक्टोबरनंतर काम बंद आंदोलनावर जाणार असल्याचे समजते. कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी विविध भत्त्यांची मागणी प्रलंबित आहे.

कंत्राटदारांचे साडेतीनशे कोटी थकीत 
महापालिकेकडे कंत्राटदारांचे साडेतीनशे कोटी रुपये थकीत असल्याची माहिती आहे. फेब्रुवारीपासून कंत्राटदारांना एक रुपया देण्यात आला नाही. गेल्या आठ महिन्यांपासून कंत्राटदारांच्या फाईल्सचा ढिगारा पडला आहे. कंत्राटदारांच्या संयमाचा बांध कधीही फुटण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.