सँडहर्स्ट रोड ते भायखळा रेल्वेलगतचे ध्वनी प्रदूषण रोखा! शिवसेनेची रेल्वे व्यवस्थापकांकडे मागणी

सँडहर्स्ट रोड ते भायखळा रेल्वे मार्गालगत राहत असलेल्या रहिवाशांना गेल्या चार ते सहा महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. इंजिन आणि जनरेटरच्या रेल्वे गाड्यामधून येणाऱ्या आवाजामुळे, भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असून तेथील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नवजात बालके, विशेषतः रुग्ण यांना जगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना उपनेते आमदार मनोज जामसुतकर यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली.

भायखळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या रेल्वे मार्गालगत असलेल्या रझा व्हिला कंपाऊंड, चिजगर टॅरेस, हबीब विला, शुभ संदेश, अजय, संजय, अशोक अपार्टमेंट नेसबीट रोड, लोअर लेव्हल या इमारतींमधील रहिवाशांसह मनोज जामसुतकर यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे लेखी निवेदन सादर करत ही मागणी केली.

डेब्रिज, कचऱ्याची समस्याही वाढली  

इमारतीच्या पंपाऊंडच्या मागे रेल्वे लाईनलगत डेब्रिज, कचरा फेकला जात असल्याने तेथे मोठय़ा प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या प्रकरणी कार्यवाही करण्याकरिता स्थानिक रहिवाशांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी येत आहेत हेही जामसुतकर यांनी रेल्वे व्यवस्थापकांच्या निदर्शनाला आणून दिले.

इंजिन, गाड्या कमी मनुष्यवस्तीच्या ठिकाणी उभ्या करा!

मनुष्यवस्ती कमी आहे अशा ठिकाणी इंजिन व जनरेटरच्या गाड्या उभ्या कराव्यात आणि ध्वनी प्रदूषण कमीत कमी कसे करता येईल याची काळजी घ्यावी, अशी मागणी मनोज जामसुतकर यांनी रेल्वेकडे केली आहे.