फडणवीसांबाबतच्या वादग्रस्त व्हिडीओवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतच्या व्हायरल व्हिडीओवरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. हा व्हिडीओ बनवणारा तरुण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याला वाचवण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांनी केल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला. त्यावर शरद पवार यांचे नाव घेण्याआधी सभागृहाला नोटीस दिली का, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या आमदारांना थंड करून टाकले.

देवेंद्र फडणवीस यांचा योगेश सावंत नावाच्या तरुणाने बनवलेला व्हिडीओ आज व्हायरल झाला. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीवरून एका सामाजिक कार्यकर्त्याने बनवलेला व्हिडीओ योगेश याने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला होता. ‘देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार, फडणवीससारखे महाराष्ट्रातले ब्राह्मण तीन मिनिटांत संपवून टाकू,’ असे या व्हिडीओमध्ये संबंधित कार्यकर्त्याने म्हटले होते.

भाजप आमदार राम कदम यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. योगेश याचे संबंध बारामतीशी असल्याचा आरोप करतानाच त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस अधिकाऱयावर दबाब आणला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. व्हिडीओमधील विधानेही त्यांनी सभागृहात वाचून दाखवली. त्याला भाजपचे आशीष शेलार यांनीही दुजोरा दिला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कदम यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. कदम यांनी नियम 57 अन्वये नोटीस न देता सभागृहात जी नावे घेतली ती कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर तालिका अध्यक्षांनी तसे निर्देश दिले. तसेच व्हायरल व्हिडीओची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले.

सभागृहात ऑक्टिंग कशाला करताय? योगेश आमचाच कार्यकर्ता – रोहित पवार

सभागृहात ऑक्टिंग कशाला करताय? योगेश सावंत हा आमचाच कार्यकर्ता आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी विधान भवन आवारात माध्यमांशी बोलताना दिली. तीन दिवसांपूर्वी फडणवीस भाजप आमदारांच्या बैठकीत संतापले होते, आपल्याबद्दल कुणी काहीही बोलते आणि भाजप आमदार गप्प राहतात अशी त्यांची तक्रार होती. त्यामुळे फडणवीसांना खूश करण्यासाठी भाजप आमदारांचे नाटक सुरू असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. पोलिसांनी योगेशला पोलीस स्टेशनला आणले होते, त्याचा जबाब घेतला, मी त्याला स्वतः भेटण्यासाठी चाललो आहे, तुम्ही त्या यूटय़ूब चॅनलवर कारवाई करत नाही, असे रोहित पवार म्हणाले.