मोडनिंबमध्ये कलाकेंद्रात वाद; रिव्हॉल्व्हर रोखली, गोळी सुटून भिंतीत घुसल्याने अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा तालुक्यातील मोडनिंब येथील राधिका कला केंद्रामध्ये नृत्यांगनांना शिवीगाळ करणाऱयांना ‘बाहेर जा, येथे वाद करू नका’, असे सांगणाऱया कलाकेंद्र मालकाच्या मुलावर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आला. यावेळी नृत्यांगनेने त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून रूमच्या भिंतीमध्ये घुसली, त्यामुळे अनर्थ टळला.

निखिल बाळू चव्हाण (रा. वेळापूर, ता. माळशिरस) असे रिव्हॉल्व्हर रोखलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी निखिल चव्हाण यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनोद किसन जाधव (वय 32, रा. अरण, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे.किसन कुंडलिक जाधव यांच्या मालकीचे मोडनिंब येथे राधिका कला केंद्र आहे. हे कला केंद्र सर्व कुटुंब चालवत असून, त्यातून येणाऱया पैशांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. राधिका कला केंद्रामध्ये एकूण चार पार्टी असून, त्यामध्ये 28 नृत्यांगना व पुरुष कलाकार नृत्य, गायन व वाजविण्याचे काम करतात.

राधिका कला केंद्रामध्ये पार्टी लावण्यासाठी दररोज वेगवेगळे लोक येतात. सायंकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत कला केंद्र सुरू असते. निखिल चव्हाण हा नेहमी कला केंद्रामध्ये येत होता. हिना अर्जुन मुसळे (रा. परिते, ता. माढा) ही त्याची मैत्रीण आहे. कला केंद्रामधील रूम नंबर 51/2 मध्ये शुक्रवारी रात्री हिना मुसळे यांची बारी (पार्टी) चालू होती. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निखिल चव्हाण व त्याचे दोन मित्र कारमधून राधिका कला केंद्रात आले. निखिल याने फिर्यादीस हिना कोठे आहे. तिची बारी चालू आहे, असे विचारले. यावर रूममध्ये बारी चालू असल्याचे सांगताच निखिल तेथे जाऊन वाद घालू लागला. तसेच त्याने नृत्यांगनांना शिवीगाळी केली. यावेळी विनोद जाधव याने निखिल याला वादविवाद करू नका, असे सांगताच त्याने विनोदवर रिव्हॉल्व्हर रोखली. तेवढय़ात नृत्यांगनेने त्याच्या हाताला धरल्याने त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून ती रूममधील भिंतीमध्ये घुसली. त्यानंतर निखिल व त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला.