बंदोबस्तावर असताना दारु प्यायली, हवालदाराला ६ महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur
प्रतिकात्मक फोटो

सामना ऑनलाईन, पुणे

महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच बंदोबस्तावर असताना दारू पिणाऱ्या हवालदाराला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पुण्याच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशामुळे पोलीस दलात पूर्वी हवालदार पदावर काम करणाऱ्या दीपक गडगे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. ही घटना २०१४ सालची असून गडगे यांनी निवडणुकीच्या बंदोबस्तावर असताना दारू प्यायल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

१४ ऑक्टोबर २०१४ रोजी एका नागरिकाचा पोलीस कंट्रोल रुममध्ये फोन आला होता. तक्रारदाराने सांगितलं की एक पोलीस दारू प्यायला आहे आणि जोरजोरात ओरडतोय. यानंतर जेव्हा पोलीस घडनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना गडगे दारू प्यायलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी गडगेंना अटक करून त्यांच्या रक्त आणि लघवीचे नमुने तपासायला पाठवले. या चाचण्यांचे अहवाल तसंच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवल्यावर पोलिसांनी गडगेंविरोधात आरोपपत्र दाखल केलं. साक्षीपुराव्यांच्या आधारे न्यायालयाने गडगेंना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

गडगे यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. घडना ज्या दिवशी घडली त्या दिवशी बरं वाटत नसल्याने आपण उपाशीपोटी औषधांचा कडक डोस घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपण कोणताही तमाशा केला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी जर त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असते तर सत्य समोर आलं असल्याचं गडगेंचं म्हणणं आहे. या घटनेनंतर २५ वर्ष पोली दलात काम करणाऱ्या आपल्याला सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचं गडगेंचं म्हणणं आहे. निवृत्तीनंतर आमच्या कुटुंबासमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहीला आहे असं गडगेंच्या पत्नीने म्हटलं आहे. पैसे नसल्याने मोठ्या मुलाला शिक्षण अर्धवट सोडावं लागल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गडगे सध्या जामिनावर असून त्यांनी या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान द्यायचं ठरवलं आहे.