हवामान बदल परिषदेत महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार, ठरले हिंदुस्थानातील एकमेव राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्कॉटलंडमध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद सुरू आहे. या परिषदेत जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम यावर चर्चा केली जात आहे. या परिषदेत जागतिक पातळीवर महाराष्ट्राने हवामान बदलासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे हिंदुस्थानातील एकमेव राज्य ठरले आहे.

राज्याला हा पुरस्कार मिळाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ”हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. मुख्यमंत्री हे उत्कट वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत आणि त्यांनी आम्हाला चांगल्या भविष्याची, हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. माझी वसुंधरा म्हणजेच माय प्लॅनेट नावाची चळवळ आम्ही सुरू केली आहे. आम्ही निसर्गाच्या पारंपारिक पाच घटकांवर लक्ष केंद्रित करत आहोत.”

तसेच यासंदर्भात ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ”स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो.”