ऐतिहासिक शोध लागला,ताम्रयुगातील रथ सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बागपत

उत्तर प्रदेशामध्ये संशोधन आणि उत्खनन करणाऱ्या पुरातत्व विभागाच्या संशोधकांना जबरदस्त यश मिळालं आहे. ५ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतीचे महत्वपूर्ण अवशेष संशोधकांना मिळाले आहेत. या संशोधनात एक रथ सापडला असून त्या काळामध्ये रथाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे महत्वाची भुमिका बजावणार आहेत. सिनौली भागात संशोधकांना एक कबर मिळाली होती, या कबरीच्या आसपासच्या परिसरात हा रथ, ढाल आणि शस्त्रांपासून संरक्षण करण्यासाठीचे कवच मिळाले आहे. यावरून ही कबर योध्याची असावी आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्याच्यासोबत पुरण्यात आल्या होत्या असा कयास संशोधकांनी बांधला आहे. याच सिनौलीमध्ये २००५ साली हडप्पाकालीन शवागृह देखील सापडलं होतं.

सिनौलीत झालेल्या उत्खननामध्ये एका महिलेचा सापळा मिळाला आहे. सापळ्याच्या बाजूला तांब्यापासून बनललेला आरसा आणि हाडांपासून बनवलेला कंगवा सापडला आहे. त्या काळातही महिलांना नटण्याची आवड होती हे या अवशेषांमुळे सहजपणे कळत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. त्या काळात लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता, पुढच्या जन्मीही महिलेला नटण्यासाठी कंगवा आणि आरशाची मदत होईल या विश्वासाने महिलांच्या शेजारी या दोन गोष्टी ठेवल्या जात असाव्यात असं संशोधकांना वाटतंय. या भागामध्ये करण्यात आलेल्या उत्खननात ८ मानवी सापळे, ताम्रयुगातील तीन तलवारी, मातीची भांडी आणि काही माणिक सापडले आहेत.