
मुलाच्या चोरीच्या अफवेवरून बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यात गावकऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकासह दोन हवालदारांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. बुधवारी एका तक्रारीच्या तपासासंदर्भात पोलीस गावातल्या एका व्यक्तीच्या घरी पोहोचले तेव्हा ही घटना घडली. पोलीस या व्यक्तीच्या घरी पोहोचले असता या घरातील लोकांनी पोलीस मुलांना चोरून नेहण्यासाठी आले आहेत, अशी आरडाओरड सुरू केली. यानंतर जमलेल्या जमावाने पोलिसांना मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शर्मा हे दोन हवालदारांसोबत बालोचक गावात गेले होते. याच गावात राहणारा आबिद मियांने पोलीस ठाण्यात आपल्या घरासमोर एक लावारीस मोटारसायकल उभी असल्याची तक्रार केली होती. या संदर्भात पोलीस पथक तपासासाठी तेथे पोहोचले होते. पोलीस गावात येताच आबिदच्या घरातील माणसांनी मुले चोरणारी टोळी आली, अशी आरडाओरड सुरू केली. आरडाओरड एकूण अबिदच्या घराजवळ लोकांची मोठी गर्दी जमली.
यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी पोलीस उपनिरीक्षकासह दोन्ही हवालदारांना मारहाण करून दोन तास बांधून ठेवले. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ शैलेंद्र कुमार अतिरिक्त पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि बंदिस्त पोलिसांची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली. ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक दिनेश शर्मा गंभीर जखमी झाले असून त्यांना मुझफ्फरपूरच्या एसकेएमसीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी जेव्हा पोलिसांनी हल्ला केला तेव्हा ते आपल्या वर्दीत असल्याचा दावा शैलेंद्र कुमार यांनी केला आहे. यावर ग्रामस्थ आणि आबिद कुटुंबीयांनी सांगितले की, पोलीस त्यांच्या गणवेशात नव्हते.
चकिया पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सिंह यांनी गावकऱ्यांवर आरोप केला आहे की, त्यांनी पोलीस उपनिरीक्षकांची रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण हवालदारांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. याप्रकरणी चकिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी आरोपी म्हणून नोंद करण्यात आलेले आबिद व हमीद मियां फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.


























































