शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवणारी ‘कॉपी’

688

आजच्या दैनंदिन जीवनात कॉपी शब्द अनाहुतपणे वापरला जातो. मोबाईलच्या आजच्या काळात कॉपी-पेस्ट ही कृती प्रत्येकाकडून अनाहुतपणे होत असते, पण शालेय जीवनात मात्र ‘कॉपी’ या शब्दाचा अर्थ खूप गहन असून नकारात्मक आहे. एखाद्याचे शैक्षणिक जीवनच उद्ध्वस्त करणाऱ्या ‘कॉपी’चा नवा अर्थ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच या सिनेमाचे नावही ‘कॉपी’ असे ठेकण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा सिनेमा येत्या 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

‘कॉपी’ या शीर्षकाचा सिनेमा बनवण्याची मूळ संकल्पना असलेल्या गणेश रामचंद्र पाटील यांनीच या सिनेमाची निर्मितीही केली आहे. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाचा विषय सर्वव्यापी आहे. जगासमोर स्वतःला सिद्ध करण्यापूर्वी प्रत्येकाला शिक्षण व्यवस्थेच्या दिव्यातून बाहेर पडावे लागते. आज शिक्षणाचा बाजार झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांसोबत पालकही होरपळत आहेतच, पण एखाद्या खेडय़ातील शाळेत प्रामाणिक ज्ञानदानाचे कार्य करणाऱया शिक्षकांचीही या चक्रव्यूहातून सुटका झालेली नाही.  हाच धागा पकडून आजवर कधीही समोर न आलेले कथानक ‘कॉपी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले आहे.

आजवर विनोदी भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे या सिनेमात शिक्षकाच्या काहीशा गंभीर भूमिकेत दिसणार आहे. आजपर्यंत बऱ्याचदा पोलिसी भूमिकेत दिसलेले जगन्नाथ निवंगुणे यांनीही शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारली आहे.  एशियन फिल्म फेस्टिव्हल, लॉस एंजेलिस सिने फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव, 55 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा तसेच इतर नामांकित सिनेमहोत्सवाममध्ये आपला वेगळा ठसा उमटवणे हे ‘कॉपी’चं आणखी एक वैशिष्टय़ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या