गावात घुसलेल्या मगरीला बांधून ठेवले, सुटकेसाठी मागितले 50 हजार रुपये

उत्तर प्रदेशातील बरेलीजवळचं मिदानिया गाव हे तसं शांत गाव आहे. दुधवा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या या गावात तीन दिवसांपूर्वी हलकल्लोळ माजला होता. उत्तर प्रदेशातील काही भागात पडत असलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यासोबत एक मगर वाहून मिदानिया गावात आली होती. ही मगर एका शेतात साचलेल्या पाण्यात पोहताना काही गावकऱ्यांना पाहिली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

मगर आल्याचे कळाल्यानंतर गावामध्ये जबरदस्त घबराट पसरली, मात्र ती काही मिनिटेच टिकली. इथल्या गावकऱ्यांनी भीती चेपल्यानंतर मगरीला बांधून ठेवत तिला ओलीस ठेवून खंडणी स्वरुपात पैसे उकळण्याचं ठरवलं. त्यानुसार या मगरीला त्यांनी बांधून ठेवले. यानंतर त्यांनी प्रकल्पाच्या बफर झोनसाठीचे उपसंचालक अनिल पटेल यांना फोन केला आणि मगर हवी असेल तर 50 हजार रुपये द्या अशी मागणी केली. मगरीला सुखरूप ठेवण्यासाठीची ही रक्कम असल्याचे गावकऱ्यांनी आपल्याला सांगितले असे पटेल यांनी सांगितले आहे. पटेल यांनी ही विचित्र मागणी ऐकल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी पोलिसांसह गावाकडे धाव घेतली.अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला. तरीही गाववाले ऐकत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसांच्या मदतीने कारवाईचा इशारा दिला. ज्यानंतर गावकरी थोडे नरमले.

मंगळवारी मगर दिसल्याचे वन विभागाला कळाल्यानंतर अनिल शहा यांच्या नेतृत्वात एक पथक गावाकडे पाठवण्यात आले होते. ते गावात पोहोचेपर्यंत अंधार झाल्याने त्यांनी परत माघारी फिरण्याचं ठरवलं होतं. बुधवारी सकाळी गावकऱ्यांना पुन्हा वन अधिकाऱ्यांना फोन आला होता. आपणच मगरीला पकडतो असं गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना सांगायला सुरुवात केली. बुधवारी शहा आणि त्यांचे पथक गावात पोहोचले तेव्हा त्यांच्या सामना संतप्त गावकऱ्यांशी झाला. या गावकऱ्यांनी मगर पकडली होती आणि ती सोडण्यासाठी खंडणी मागायला सुरुवात केली. वन अधिकारी वेळेत येत नसल्याने आपणच मगरीला पकडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मगर पकडण्यासाठी त्यांनी शेतात साठलेला चिखल-पाणी बाजूला केला आणि त्यानंतर मगरीला पकडले. या साठी 15 माणसांनी त्यांचा जीव धोक्यात घातला होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या 15 जणांची यादी गावच्या संरपंचाने अधिकाऱ्यांना दिली आहे. वन अधिकाऱ्यांनी जे काम केले नाही ते आम्ही केले, आम्हाला याचा मोबदला मिळाला पाहिजे अशी मागणी सरपंचांसह सगळ्या गाववाल्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या