स्थानिक क्रिकेटपटूंना कोरोनाचा फटका!

440

जे क्रिकेटपटू वर्षानुवर्षे स्थानिक क्रिकेट खेळत असतात, आंतरराष्ट्रीय व आयपीएल क्रिकेटसाठी त्यांची निवड झालेली नसते, अशा क्रिकेटपटूंना मध्यवर्ती करारात समावेश करून त्यांचे मानधन वाढवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी या वर्षी मार्च महिन्यात याबाबत घोषणा केली, पण कोरोनामुळे अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे नव्या योजनेचा शुभारंभ या वर्षापासून करण्यात येतो की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही. मात्र कोरोनाचा फटका स्थानिक खेळाडूंना बसू नये अशी चर्चा क्रिकेट वर्तुळातून रंगू लागली आहे.

सध्या बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यामागे 35 हजार रुपये मिळतात. यामध्ये एकूण महसुलामधून मिळणाऱया टक्केवारीचा (ग्रॉस रेव्हेन्यू शेअर, जीआरएस) समावेश केल्यास त्या खेळाडूला एका प्रथम श्रेणी सामन्यामधून 2.5 लाख रुपये मिळतात. अर्थात त्यांना जीआरएस मिळाल्यानंतर ही रक्कम वाढते. या सर्व बाबींवर बीसीसीआयचे लक्ष आहे. खेळाडूंशी मध्यवर्ती करार केल्यास कोणत्या खेळाडूंना त्यामध्ये संधी द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय तेथील क्रिकेट संघटना घेईल असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या