
संभाजीनगर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेक्नॉलॉजी वापरण्याची केलेली सूचना संभाजीनगर शहर व जिल्ह्याकरिता चांगलीच फायदेशीर ठरली आहे. आतापर्यंत ८० हजार नागरिकांच्या हजार टेस्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी ८ हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांचा वेळीच शोध लागत असल्याने ही अँटीजेन टेक्नॉलॉजी फायदेशीर ठरली असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले, कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची सूचना मंत्री महोदयांनी केली होती. तसेच आरसीएमआरनेही टेस्ट ऑफ डिमांड हा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने तातडीने अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्टिंग करण्यासाठी किटची खरेदी केली. आतापर्यंत शहरात ८० हजार नागरिकांच्या टेस्ट झाल्या असून, त्यातून ८ हजार जण पॉझिटिव्ह आढळून आले. या अँटीजेन टेक्नॉलॉजीचा फायदा झाला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार कोरोना रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींची कोरोनाविषयक पडताळणीसाठी अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सात कलमी कार्यक्रम राबवत असून, त्याअंतर्गत कोरोना रुग्णाच्या संपर्कातील बाधित व्यक्तींना शोधून त्यांच्यावर उपचार केला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संभाव्य पैâलाव रोखण्यास मदत झाली आहे.
टास्क फोर्स आणि कंट्रोल रुम
आयुक्त म्हणाले, शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू होताच महापालिकेने सर्वात आधी टास्क फोर्स स्थापन केले. टास्क फोर्सच्या पथकाद्वारे कॉन्टॅक्ट मॅपिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हायरिस्क व लो रिस्क रुग्ण शोधण्याचे कार्य हाती घेण्यात आले. ३५ कर्मचारी हे काम करीत आहेत. टास्क फोर्सच्या पथकाने बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. २४ तास सेवा देण्याकरिता कंट्रोल रुम सुरू केले असून, या कंट्रोल रुममधून अॅम्ब्युलन्स, सिटीबसचे ऑपरेट करुन संशयित व्यक्तींना कोविड सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येत आहे. रुग्णांशी डॉक्टरांचा संपर्कही करुन देण्यात आला आहे.
१ लाख ४ हजार ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण
एक हजार मोबाईल फिवर क्लिनिकव्दारे थर्मलगन, ऑक्सिमीटरच्या साह्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात शहरात १ लाख ४ हजार ८८९ ज्येष्ठ नागरिक आढळून आले. या नागरिकांवर कंट्रोल रुममधून वॉच ठेवला जात आहे. जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. त्याकरिता एमएचएमएच अॅप तयार करण्यात आला. अॅपव्दारे कोविड केअर सेंटर, खासगी व सरकारी हॉस्पिटलमधील खाटांची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच स्वत:चे स्क्रिनिंग केले जाते. मोबाईलव्दारे संपूर्ण माहिती कंट्रोलरूमला प्राप्त होते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपचार करण्यास मदत झाली. अॅम्ब्युलन्स आणि सिटीबसचा उपयोग बाधित व संपर्कातील व्यक्तींना ने-आण करण्यासाठी झाला.
एन्ट्री पॉइंटवर तपासणी करणारी पहिली मनपा
नऊ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील केवळ संभाजीनगर मनपाने या निर्णयाची अंमलबजावणी केली व ती यशस्वीपणे केली. त्यामुळे शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत झाली. त्यासोबतच शहरातील व्यापारी, भाजीपाला-फळ-मांस-अंडे, दूध विक्रेते, किराणा, सलून दुकानदार यांची टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत २० हजार जणांची टेस्टिंग झाली असून, त्यापैकी ५०७ पॉझिटिव्ह आढळून आले. या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

























































