कोरोनाच्या संकटात परळीत वीटभट्ट्या सुरूच

667

सध्या कोरोना विषाणू संदर्भाने खबरदारी म्हणून संपूर्ण देशभरात लॉक डाऊन आहे. मात्र परळी तालुक्यातील वीट भट्ट्यांवर मजूर रविवारी काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. गांभीर्य नसलेल्या वीट भट्टी मालकांकडून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांची पायमल्ली होत असून या वीट भट्ट्यांवर आत्तापर्यंत का कारवाई केली गेली नाही असा प्रश्न उभा ठाकला आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात अंदाजे 2000 वीटभट्ट्या आहेत. या वीट भट्टीवर इतर राज्यातील कामगार काम करतात. संपूर्ण परळी शहराला वीट भट्ट्यांनी वेढा घातलेला आहे. विशेषतः नागापूर, डोंगरतुकाई, मलकापूर, गंगाखेड, घाटनांदूर या परिसरात, धर्मापुरी, सिरसाळा या रस्त्याना वीट भट्ट्यांच्या हबचे स्वरूप आलेले आहे. दर मोसमाला लाखोंच्या संख्येने विटा परराज्यात पाठवल्या जातात. यामुळे होणारे प्रदूषणही परळी परिसरातील नागरिकांना घातक आहे. हे चित्र नेहमीचं असलं तरी या बंदच्या काळातही ते सुरू आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात लॉक डाऊन सुरू होऊन पाच ते सहा दिवस झाले. तरी एवढा दिवसात परळी तालुक्यातील वीटभट्ट्या बंद केल्या नसल्याने भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, संस्था सध्या नागरिकांचे आरोग्य सुरक्षेची बाब म्हणून बंद केले आहेत. मात्र संचारबंदी असतांना वीट भट्टीवर कामगार काम करतातच कसे? एकीकडे सोशल डिस्टन्स पाळा असे स्वतः देशाचे पंतप्रधान ओरडून सांगत आहेत. तर दुसरीकडे परळी परिसरात असलेल्या वीट भट्टीचे मालक मात्र आपल्या कामगारांचा जीव धोक्यात घालून तर काम करून घेत नाहीयेत ना हे प्रशासनाने पाहिले पाहिजे.

वीट भट्टी बंद ठेऊन कामगारांना वेतन दिले पाहिजे
लॉक डाऊन च्या काळात संचारबंदी असतांना तरी वीट भट्ट्या बंद केल्या पाहिजेत. दरम्यानच्या काळात वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना लॉक डाऊन च्या काळात वीट भट्टी चालकाने वेतन देऊन त्या सर्व कामगारांना कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूपासून दूर ठेवले पाहिजे, असे मत परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी मांडले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या