पश्चिम महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर, रुग्णसंख्येत लक्षणीय घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या 10च्या आत असून, नगर जिह्यात ही संख्या 50च्या आत आली आहे. तसेच मृतांची संख्याही नगण्य आहे. त्या तुलनेत बऱया होणाऱया रुग्णांची संख्या अधिक असून, सगळीकडेच ऑक्टिव्ह रुग्णसंख्याही अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार होत असल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे. दरम्यान, राज्य शासनाने कोरोनावरील बहुतांशी निर्बंध हटविल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात आज सात रुग्ण आढळले असून, रुग्णसंख्या दोन लाख 19 हजार 676वर पोहोचली आहे. आज एकाचाही मृत्यू झाला नसून, मृतांची संख्या 5230वर स्थिर आहे. सात रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आजवर दोन लाख 14 हजार 395 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मनपाहद्दीत तीन रुग्ण आढळले असून, दोन रुग्ण बरे झाले आहेत. पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात चार रुग्ण आढळले असून, पाच रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, 24 तासांत केवळ चार रुग्णांची नोंद झाली आहे. सातारा, खटाव, कराड आणि वाई तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. बाधितांची संख्या दोन लाख 80 हजार 162वर गेली असून, जिह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.51 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एकाचाही मृत्यू झाला नसून, मृतांची संख्या 6681वर स्थिर आहे. 22 रुग्ण बरे झाले असून, आजवर दोन लाख 71 हजार 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

सांगली जिल्ह्यात आज तीन रुग्ण आढळले असून, पाच रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बाधितांची संख्या दोन लाख 13 हजार 867वर पोहोचली आहे. आजवर दोन लाख आठ हजार 335 रुग्ण बरे झाले आहेत. 24 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकाचाही मृत्यू झाला नसून, मृतांची संख्या 5508वर स्थिर आहे. महापालिका क्षेत्रात आज एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात आज अवघे दोन बाधित

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अवघ्या दोन रुग्णांची नोंद झाली असून, बाधितांची संख्या दोन लाख 20 हजार 301 झाली आहे. हे दोन्ही रुग्ण इचलकरंजीत आढळले आहेत. महापालिका क्षेत्रासह उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये आज एकही रुग्ण आढळलेला नाही. आज एकाचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 5911वर

गेली आहे. तीन रुग्ण बरे झाले असून, आजवर दोन लाख 14 हजार 355 रुग्ण बरे झाले आहेत. 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नगर जिल्ह्यात 24 कोरोनाबाधितांची भर

नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 24ने वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या तीन लाख 94 हजार 290वर पोहोचली आहे. आज 76 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आजवर तीन लाख 86 हजार 829 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 98.11 टक्क्यांवर आले आहे. मृतांची संख्या 7223वर स्थिर असून, 238 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपाहद्दीत 15 रुग्ण आढळले असून, 24 रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित 14 तालुक्यांमध्ये 11 रुग्ण आढळले आहेत.