
राज्यात सध्या दररोज 25 हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्या येत्या काळात वाढवल्या जातील. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने राज्य सेफ झोन मध्ये आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी राज्यातील कोरोना स्थिती बद्दल माध्यमांशी संवाद साधला
यावेळी ते म्हणाले की राज्यात सध्या 931 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. राज्यात कधीकाळी एका दिवसात 65 हजार ते 70 हजार कोरोना रुग्ण असायचे त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. सध्या महाराष्ट्रात दर 10 लाख नागरिकांमागे 7 रुग्ण सापडत आहेत. मात्र इतर राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला चाचण्यांचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्ण सापडत आहेत अशा ठिकाणी आम्ही ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग वाढवणार आहोत. कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाणार आहे. सर्व ठिकाणी नव्याने सापडणारे रुग्ण हे ओमायक्रॉन व्हेरिएंटचेच आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट राज्यात आलेला नाही.
लसीकरणावर भर दिला जाणार
येत्या काळात लसीकरणावर भर दिला जाणार आहे. 6 ते 12 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगीही दिली आहे. त्यामुळे आता त्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. त्यासंबंधी अद्याप कोणत्याही नियम व अटी आलेल्या नाहीत, मात्र त्या आल्यावर त्याची अंमलबाजवणी केली जाणार आहे. 12 ते 15 आणि 15 ते 17 या शाळेत जाणाऱ्या वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर देखील भर देण्यात येणार आहे. यासाठी योग्य ते नियोजन केले जाणार आहे. असे टोपे यांनी सांगितले.
मास्क सक्ती ?
सर्व ठिकाणी प्रिकॉशन डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांना प्रिकॉशन डोस घ्यायचे असतील त्यांनी ते घ्यावेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय होऊ शकतो. दिल्ली व लगतच्या जिल्ह्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात मास्क सक्ती करावी का हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांचा असणार आहे. असे टोपे म्हणाले.
इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्रोग्रॅम या अंतर्गत खाटा वाढवणे, आयसीयू खाटा वाढवणे हॉस्पिटलच्या सुविधा वाढवणे याकडे लक्ष दिले जाणार आहे. या सर्व गोष्टींना येणाऱ्या खर्चाच्या बाबतीत राज्य हे देशाच्या तुलनेत पुढे आहे. त्यामुळे चिंता करण्याची गोष्ट नाही. राज्यातील सर्व रुग्णालयांना फायर ऑडिट संदर्भांत आणि अग्नी सुरक्षेसंदर्भात दक्षता घेण्यास सांगितले आहे. कोरोना उपचारांच्यावेळी लागणारी सर्व उपकरणे चालू स्थितीत राहतील यासंदर्भात देखील रुग्णालयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पीजी साठी इन सर्व्हिस कोटा देण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागात पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. असे टोपे म्हणाले.


























































