
चीनमधून हाहाकार उडवून दिलेल्या कोरोना विषाणूने जवळपास सर्वच जग व्यापले आहे. चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 80,400 हून अधिक झाली आहे. वुहान प्रांतातील परिस्थिती आणखी गंभीर बनली असून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवल्या जात आहेत. दुसरीकडे कोरोनाचा विळखा आता अन्य देशांनाही पडला असून त्यात प्रामुख्याने इटली या देशाचा समावेश झाला आहे.
शनिवारी इटलीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली, तेव्हा अवघ्या एका दिवसात 4636 जणांना याची बाधा झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,247वरून वाढून 5883 इतकी झाली आहे. तर इटलीत आतापर्यंत 233 जण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे इटलीच्या सरकारने मिलान शहराजवळील लोम्बार्डी या प्रदेशाला आता संरक्षित करण्याची योजना बनवली आहे. जेणेकरून व्हेनिस आणि पर्मा तसंच रिमीनीच्या उत्तर भागातील शहरांमध्ये कोरोनाला फैलावण्यापासून रोखता येईल. तीन एप्रिलपर्यंत या प्रदेशांमध्ये बाहेरच्या देशातील नागरिकांना प्रवेश निषिद्ध असणार आहे. कारण, मिलान ही इटलीची आर्थिक राजधानी असून त्याची लोकसंख्या 14 लाख इतकी आहे. तर लोम्बार्डी प्रदेशाची लोकसंख्या 1 कोटी इतकी आहे. त्यामुळे आर्थिक कणा टिकवून ठेवण्यासाठी इटालियन सरकारने ही पावलं उचलली आहेत.
जगभरातील जवळपास 30 कोटी विद्यार्थ्यांना फटका
कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील जवळपास 30 कोटी शाळकरी मुलांना मागील काही आठवडय़ांपासून घरातच राहावे लागत आहे. त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावर कोरोनाचा गंभीर परिणाम झाला आहे.
दक्षिण कोरियात कहर
कोरोनाने दक्षिण कोरियातही हाहाकार उडवला आहे. देशात जवळपास 6 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आतापर्यंत 36 देशांतील नागरिकांना दक्षिण कोरियात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 50 अब्ज डॉलर्सची मदत
कोरोनाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली आहे. जगावर ओढवलेल्या या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 50 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत पुरवली आहे. कोरोनाचा जगभरातील फैलाव अत्यंत गंभीर बाब आहे. परिस्थिती आणखी भीषण बनण्याची भीती आहे. याचा आपणा सर्वांनाच फटका बसणार आहे. त्यामुळे आपण ही आर्थिक मदत उपलब्ध करीत असल्याचे आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा यांनी सांगितले.
यंदा विमान कंपन्यांचे 113 अब्ज डॉलर्स नुकसान
जगभर दहशत माजवलेल्या कोरोनाचा हवाई क्षेत्रालाही मोठा फटका बसणार आहे. या विषाणूच्या फैलावामुळे यंदा विमान कंपन्यांचे तब्बल 113 अब्ज डॉलर इतके नुकसान होणार आहे. जगभरातील प्रवासी महसुलात 19 टक्क्यांची घट होण्याची भीती’ इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ने व्यक्त केली आहे.




























































