देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना पुन्हा कात्री, कोरोनाचा फटका पुढील मोसमातही बसणार

गेल्या मोसमात कोरोना संसर्गाचा फटका हिंदुस्थानातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांना बसला. आता 2021-22 सालामधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांवरही कोरोनाचे पडसाद उमटणार आहेत. सध्या हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आगामी स्थानिक मोसमांतील क्रिकेट स्पर्धांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार रणजी, विजय हजारे व सय्यद मुश्ताक अली या तीन स्पर्धांना प्राधान्य देण्यात आले आहे. पण बीसीसीआयकडून अंतिम वेळापत्रकावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

डिसेंबर ते मार्चमध्ये प्रतिष्ठेची स्पर्धा

रणजी स्पर्धा मागील मोसमात खेळविण्यात आली नाही. 87 वर्षांमध्ये असे पहिल्यांदाच घडले, पण आगामी मोसमात देशातील प्रतिष्ठsची समजली जाणारी रणजी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. डिसेंबर ते मार्च या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.

आयपीएलचा लिलाव ठरणार महत्त्वाचा

हिंदुस्थानात या वर्षी टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 2022 सालामध्ये आयपीएलचे नवे स्वरूप तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळेल. या स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्याआधी आयपीएलचा मोठा लिलावही पार पडणार आहे. त्याआधी सफेद चेंडूने खेळवण्यात येणाऱया दोन स्पर्धांच्या आयोजनाकडे बीसीसीआयचा कल आहे. या दोन स्पर्धांमध्ये आपली धमक दाखवल्यास देशातील युवा खेळाडूंवर आयपीएलच्या लिलावात जास्त रकमेची बोली लागू शकते हे यामागील कारण आहे. या वर्षी मोसमाच्या सुरुवातीलाच अर्थातच सप्टेंबर महिन्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (टी-20) व नोव्हेंबर महिन्यात विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करणार आहे.

इराणी, देवधर, दुलीप ट्रॉफीचा विचार नाही

बीसीसीआयने आगामी मोसमातील स्पर्धांचा तात्पुरता आराखडा तयार केला आहे. यावर अजून शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. पण इराणी ट्रॉफी, देवधर ट्रॉफी व दुलीप ट्रॉफी या महत्त्वाच्या स्पर्धांनाही आगामी मोसमात स्थान देण्यात आलेले नाही. तसेच महिलांच्या पाच स्पर्धांनाही डच्चू देण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या