हिंदुस्थानचा इंग्लंड दौरा; सौरभ गांगुलीसह बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना ‘नो एण्ट्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा पुरुष व महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱयावर जाणार असून या वेळी दोन्ही संघांतील क्रिकेटपटू व सपोर्ट स्टाफच्या कुटुंबियांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून मंगळवारी देण्यात आली. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शहा यांच्यासह बीसीसीआयच्या इतर पदाधिकाऱयांना इंग्लंडच्या दौऱयावर जाता येणार नाही. इंग्लंडमध्ये कोरोनासाठी कडक नियमांचा अवलंब करण्यात येत आहे. याच कारणामुळे बीसीसीआय पदाधिकाऱयांना या दौऱयासाठी ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे.

प्रदीर्घ दौरा अन् बायोबबलमुळेच

हिंदुस्थानचे दोन्ही संघ (पुरुष व महिला) इंग्लंड दौऱयावर जाणार आहेत. या वेळी दौरा प्रदीर्घ असणार आहे. तसेच या कालावधीत कडक नियमांचेही खेळाडूंना पालन करावे लागणार आहे. त्यामुळे क्रिकेटपटू व सपोर्ट स्टाफसोबत कुटुंबियांना या दौऱयावर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयकडून इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडे करण्यात आली होती. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले.

कोरोनासाठी कडक नियम

इंग्लंडमध्ये कोरोनासाठी कडक नियम तयार करण्यात आले आहेत. बीसीसीआयचे पदाधिकारी हे खेळाडूंसोबत नसणार आहेत. त्यामुळे त्यांना कडक क्वारंटाईनला सामोरे जावे लागेल. दहा दिवस त्यांना विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या पदाधिकाऱयांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

14 दिवसांचे विलगीकरण अन् सहा कोरोना चाचणी

हिंदुस्थानचा पुरुषांचा क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच त्याआधी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळणार आहे. हिंदुस्थानी महिलांचा क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांना त्याआधी 14 दिवसांच्या विलगीकरणाला सामोरे जावे लागेल. यात खेळाडूंच्या सहा कोरोना चाचण्या करण्यात येतील. पहिल्या तीन दिवसांच्या विलगीकरणानंतर खेळाडूंना नेटमध्ये सराव करता येणार आहे. जिम्नॅशियममध्येही फिटनेसवर लक्ष देता येणार आहे. हिंदुस्थानचा पुरुषांचा संघ तीनदिवसीय सराव सामनाही खेळणार आहे.