
गेल्या वर्षभरापासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करीत असताना पालिकेचे तब्बल 30 हजार सफाई कामगार ऊन-पाऊस, वादळ-वाऱयाची पर्वा न करता मुंबई शहर स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. वर्षभराच्या कोरोना लढय़ात 50 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील सफाई कामगार मुंबईच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करीत आहेत.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी काम करीत आहे. यामध्ये पालिकेसोबत खांद्याला खांदा लावून हजारो सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करीत आहेत. यामध्ये महिला कामगारांची संख्याही मोठी आहे. सफाई कामगारांचे काम दिवसरात्र तीन पाळ्यांमध्ये चालते. एका वेळी सुमारे 20 ते 22 हजार कर्मचारी स्वच्छतेचे काम करीत असतात. कोरोनाचा धोका असल्यामुळे लागू केलेल्या निर्बंधामुळे अनेक आस्थापनांमध्ये मर्यादित कर्मचारी बोलावून काम सुरू आहे.
अशी घेतली जातेय काळजी
स्वच्छतेचे काम करीत असताना सफाई कर्मचाऱयांचा थेट संपर्क घातक कचऱयाशी येत असतो. कचऱयातील अनेक घटक हे मानवी आरोग्यास हानीकारक असतात. त्यामुळे हे काम करीत असताना घ्यावयाच्या काळजीबाबत पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱयांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. सॅनिटायझर, मास्कचा वापर, शक्य त्या ठिकाणी पीपीई कीट, हॅण्डग्लोव्हज, गमबूटचा वापर केला जात आहे. कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडून आवश्यक साधनांचा पुरवठाही केला जातो. स्वतःची काळजी घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही आमच्या लहान मुलांना घरी सोडून पहाटे 5 वाजता सफाईच्या कामासाठी आणि तुमच्यासाठी घराबाहेर पडत आहोत. त्यामुळे सध्या निर्बंध कडक असल्यामुळे सर्वांनी नियम पाळा. घरात राहून प्रशासनाला सहकार्य करा! – दुर्गा गोलार
कोरोनाच्या महामारीत आम्ही सर्व सफाई कामगार आमच्या जिवाची पर्वा न करता मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहोत. कोरोनामुळे सर्वांवर निर्बंध लागले असताना आम्ही मुंबईकरांसाठी महत्त्वाचे काम करून आमची जबाबदारी पार पाडत आहोत. – प्रमोद लोखंडे
कोरोनासारख्या विषाणूच्या प्रादुर्भावातही आम्ही मुंबईकरांसाठी काहीतरी काम करून आपले कर्तव्य निभावत आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही आमचे काम करीत आहोत. तुम्ही काळजी-खबरदारी घ्या! सर्वांनी मिळून कोरोनाला हरवू! – शुभांगी कांबळे
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी स्वच्छतेचे काम करण्यासाठी प्रशासनाकडून-वरिष्ठांकडून आम्हाला कोरोना खबरदारीचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही आमचे काम जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने करीत आहोत. आपण लवकरच कोरोनाला हरवू! – आनंद खैरे





























































